In the past, the stolen session will be restarted | पारोळ्यात चोरीचे सत्र पुन्हा सुरू
पारोळ्यात चोरीचे सत्र पुन्हा सुरू

पारोळा- शहरात एकाच दिवशी दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील साहित्य व रोख रक्कम लंपास केली. १७ रोजी रात्री दुकानाच्या छताचे पत्रे कापून दुकानात प्रवेश करीत ही चोरी करण्यात आली. यापूर्वीही अशाचप्रकारे चोऱ्या केल्या होत्या या प्रकाराला काही दिवस आळा बसत नाही तोच पुन्हा हे सत्र सुरु झाले आहे.
विशेष म्हणजे एकाच महिन्यात एकाच दुकानाला दुसऱ्यांदा लक्ष करीत चोरी केली आहे. यामुळे या परिसरातील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी पारोळ्यात खाकीचा धाक संपला की काय? असे बोलले जात आहे.
या घटनोबाबत माहिती अशी की, पहाटे पीर दरवाजा जवळील बाळा सोनार यांच्या मालकीच्या व्यंकटेश मोबाईल शॉपच्या छताचा पत्रा कापून दोराच्या सहाय्याने दुकानात उतरून दुकानातील मोबाईल डिस्प्ले एकूण १० पंधरा हजार रुपये किंमतीचे, हेडफोन बॅटरी बारा हजार रुपये किंमतीचे, दुरुस्ती साठी आलेले मोबाईल आठ हजार रुपये किंमतीचे, रोख रक्कम चार हजार रुपये असे एकूण ३२ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या. तर याच दुकानाच्या बाजूला असलेले सोनू मराठे याच्या मालकीचे आई तुळजाभवानी या दुकानातही छताचा पत्रा कापून दुकानात प्रवेश करुन १० वायर बंडल १५ हजार रुपये किमतीचे, एक फॅन २३०० रुपये किमतीचा, किरकोळ साहित्य १५०० रुपये किमतीचे रोख रक्कम एक हजार असे एकूण १९ हजार रुपये किमतीचा माल या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी याच दुकानाला चोरट्यांनी लक्ष केले होते. त्यात ३० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. पोलिसात तक्रार दाखल केली तपास तर लागला नाही. मात्र चोरट्यांनी दुसºयांदा दुकानाला लक्ष करीत चोरी केली. त्यावेळी पोलीस विभागाकडून या दुकानात गस्त साठी डायरी ठेवण्यात आली होती. पण एकाही दिवशी रात्रीच्या गस्तवर असलेल्या पोलिसांकडून भेट दिली गेली नाही. डायरीवर कोणाची गस्तची सही नाह. या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

व्यंकटेश मोबाईल या दुकानाच्या छताचा पत्रा कापून दुकानात दोराच्या साह्याने चोरट्यांनी प्रवेश केला .


Web Title: In the past, the stolen session will be restarted
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.