पॅसेंजर गाड्या ‘बंद’ने व्यवसाय ‘लॉकच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:47+5:302021-08-23T04:19:47+5:30
भुसावळ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या व प्रत्येकी दोन डोस घेतलेल्यांना ...

पॅसेंजर गाड्या ‘बंद’ने व्यवसाय ‘लॉकच’
भुसावळ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या व प्रत्येकी दोन डोस घेतलेल्यांना पासेस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. असे असले तरी अन्यत्र मात्र नोकरी तथा व्यवसायानिमित्त नियमित रेल्वेद्वारे ये-जा करणाऱ्यांसाठी अद्याप पासेसची सुविधा रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली नाही. दुसरीकडे विशेष गाड्या सुरू असल्या तरी पॅसेंजर सुरू न केल्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणीचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केवळ पॅसेंजर रेल्वेच अद्यापही लॉक का? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.
भुसावळ येथून सावदा, रावेर, बराणपूर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मलकापूर, नांदुरा, शेगाव येथून व्यवसाय तथा नोकरीनिमित्ताने अनेक जण ये-जा करत आहेत. मात्र, त्यांना पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे बोर्ड अद्याप या पॅसेंजर गाड्यांना परवानगी देत नाही.
या एक्स्प्रेस आहेत सुरू
अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, बिकानेर-सिकंदराबाद एक्स्प्रेस, ओखा- गुवाहाटी द्वारका एक्स्प्रेस, गांधीधाम पुरी एक्स्प्रेस यासह आणखी चार एक्स्प्रेस धावत आहे.
पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षा
मध्य रेल्वेअंतर्गत भुसावळ विभागातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या वर्धा भुसावळ, नागपूर-भुसावळ, नरखेड-भुसावळ भुसावळ-इटारसी, भुसावळ-कटनी यासह मुंबईकडे जाणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या आहेत. मात्र, प्रदीर्घ कालावधीपासून त्या बंद आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे.
व्यवसायावर परिणाम
सुखद, सुलभ, सुरक्षित, आरामदायी व कमी दरात प्रवास करण्यासाठी रेल्वेची ओळख आहे. ग्रामीण भागासह अनेक छोट्या-मोठ्या शहरांना जोडण्याकरिता पॅसेंजर गाडीचा प्रवास सोयीचा असतो. सकाळी पॅसेंजर गाडीने उद्योग व्यवसायासाठी निघाले की संध्याकाळी, रात्रीपर्यंत आरामात पॅसेंजर गाडी पकडून घरी येणे हा पूर्ण सर्वांचाच नित्य नियम होता. त्यामुळे चांगला व्यवसाय होत होता. मात्र, सद्य:स्थितीत पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अनेकांना महागडा बस प्रवास परवडत नाही. यामुळे महागड्या प्रवासातच पैसे गेले तर दोन पैसे वाचतील कसे? यामुळे उद्योग-व्यवसाय ‘लॉक’ झालेले आहेत. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यास गोरगरिबांच्या त्या हाताला काम मिळेल, हे मात्र नक्की.
रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना
एक्स्प्रेस रेल्वेचे भाडे अधिक आहे. आम्ही नियमित अपडाऊन करणारे आहोत. त्यामुळे आम्हाला परिस्थिती पूर्ववत होत असताना मुंबईतील लोकलप्रमाणे पासेसची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. पॅसेंजर रेल्वेही सुरू केल्यास अधिक सुलभ होईल. लसीचे डोस घेतले आहेत.
- नाझेर अहमद, अपडाऊन करणारे प्रवासी, भुसावळ
व्यवसाय झाला ‘लॉक’
‘पॅसेंजर गाडीने पूर्वी अगदी लहान सहान गावांनाही जाणे कमी भाड्यात सोयीचे होत होते. शिवाय वेळेचीही बचत होती. यामुळे दोन पैसे शिल्लक राहून संसाराचा गाडा ओढण्यासाठी मदत होत होती. मात्र, सद्य:स्थितीत चारचाकी वाहनाने महागडे भाडे लागणारा वेळ यामुळे व्यवसाय करणे जणू ‘लॉक’ झाले आहे.
-हिमांशू तिवारी, व्यावसायिक, भुसावळ