परवीनच्या प्रवेशाची कागदपत्रे मिळेना
By Admin | Updated: October 21, 2014 13:19 IST2014-10-21T13:19:15+5:302014-10-21T13:19:15+5:30
इराणची विद्यार्थिनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आणि शिक्षक भवनातील प्रवेशाबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांना करण्यात आलेली नाही.

परवीनच्या प्रवेशाची कागदपत्रे मिळेना
जळगाव : इराणची विद्यार्थिनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आणि शिक्षक भवनातील प्रवेशाबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकार्यांना करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनीवर अला अब्देल या परदेशी विद्यार्थ्याने परवीन बिरगोनी या परदेशी विद्यार्थिनीच्या मदतीने अत्याचार केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अला अब्देल हा विद्यार्थी अनधिकृतपणे विद्यापीठाच्या शिक्षक भवनात राहिला असल्याचे उघड झाले. त्यानंतर प्रशासनाच्या दबावामुळे शिक्षक भवनातील कर्मचारी सीताराम पवार यांनी आत्महत्या केली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले. मात्र या प्रकरणात त्या विद्यार्थिनीच्या प्रवेशाचे घोंगडे डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा.रमेश पोतदार यांच्यावर झटकले. विद्यापीठाच्या सांगण्यावरून परवीनला संमती पत्र दिल्याचे प्रा.पोतदार यांनी म्हटले आहे. या विद्यार्थिनीच्या प्रवेशाबाबतची फाईल गेल्या दीड वर्षांपासून गायब होती. त्यातच परवीनच्या प्रवेशाबाबतची सर्व कागदपत्रे असल्याचा दावा विद्यापीठाने केला होता.
-----------
विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणाचा तपास करणार्या तपास अधिकारी कोडापे यांनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,शिक्षक भवन आणि मुलींच्या वसतीगृहातील प्रवेशाबाबतच्या कागदपत्रांची चार दिवसांपूर्वी लेखी पत्राव्दारे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने अद्याप परवीनच्या प्रवेशाबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता तपास अधिकार्यांकडे केलेली नाही. वसतीगृहाच्या अधीक्षिका शारदा चव्हाण यांनी परवीनच्या वसतीगृहातील प्रवेशाबाबत कोणतीही कागदपत्रे नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. परवीनच्या विद्यापीठ प्रवेशाबाबतचाही गोंधळच आहे. मात्र त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलून या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे.