वॉटरग्रेसच्या ठेक्यात सर्वपक्षीय नगरसेवकांसह आयुक्तांचा ही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST2021-05-10T04:15:20+5:302021-05-10T04:15:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईसाठी महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांसह मनपा ...

This is the participation of the Commissioner along with all party corporators in the contract of Watergrass | वॉटरग्रेसच्या ठेक्यात सर्वपक्षीय नगरसेवकांसह आयुक्तांचा ही सहभाग

वॉटरग्रेसच्या ठेक्यात सर्वपक्षीय नगरसेवकांसह आयुक्तांचा ही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईसाठी महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांसह मनपा आयुक्तांचा ही सहभाग असल्याचा गंभीर आरोप ॲड. विजय पाटील यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस व महापालिकेच्या मध्ये दुवा म्हणून लवाद नेमण्याचा घाट बीएचआर प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सुनील झंवर यांच्या सांगण्यावरूनच हाकला जात आहे. झंवर फरार असले तरी त्यांचे हस्तक महापालिकेत सक्रिय असल्याचाही आरोप ॲड. विजय पाटील यांनी केला आहे.

रविवारी ॲड. विजय पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अतुल तडवी आदी उपस्थित होते. १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस व महापालिकेच्या दरम्यान दुवा म्हणून काम करण्यासाठी स्वतंत्र लवाद नेमण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने महासभेत पुढे ठेवला आहे. मात्र, लवाद नेमून महापालिकेचा कोणताही फायदा होणार नसून यामुळे मनपाचे नुकसानच होणार आहे. मनपातील नगरसेवकांकडून केवळ फरार आरोपीला फायदा व्हावा यासाठी लवाद नेमण्याचा घाट आखण्यात आल्याचा आरोप ॲड.पाटील यांनी केला आहे.

प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या नगरसेवकांविरोधातही तक्रार करू

वॉटरग्रेस व मनपा त स्वतंत्र लवाद नेमणूक करण्यात आला तर यामुळे महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. लवाद नेमून केवळ संबंधित ठेकेदाराला फायदा होणार असून, मनपाचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे महासभेपुढे मनपा प्रशासनाने दिलेल्या ठरावाला मनपातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करण्याची गरज आहे. मात्र नगरसेवकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर संबंधित नगरसेवकांनी विरोधात तक्रार केली जाईल असा इशारा ॲड.पाटील यांनी दिला आहे. घरकुल प्रकरणापासून नगरसेवकांनी बोध घेऊन वॉटरग्रेसच्या लवाद नेमण्याच्या प्रक्रियेबाबत देखील नगरसेवकांनी विचार करूनच निर्णय घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

तर शासनाकडे हा ठराव विखंडन करण्यासाठी पाठपुरावा करू

मनपाच्या महासभेत जर या विषयाला मंजुरी मिळाली तर हा ठराव विखंडन करण्यात यावा यासाठी देखील शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशीही माहिती ॲड. विजय पाटील यांनी दिली. मनपातील काही जुने नगरसेवक हा ठेका चालवित असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मुळात वॉटरग्रेसचे काम सुनील झंवर यांच्या साई मार्केटिंग या कंपनीला उप ठेका देण्यात आला असून, शहरात सद्यस्थितीत साई मार्केटिंगचे काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर देखील मनपा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांचाही यामध्ये सहभाग असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच जळगाव मनपा आयुक्त म्हणून वर्णी लागावी यासाठी सुनील झंवर त्यांनी सतीश कुलकर्णी यांना मदत केली असून, त्याच मदती पोटी आयुक्त देखील झंवर यांची परतफेड करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यासह वॉटरग्रेस कंपनीने मनपा विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असताना मनपाने त्याविरोधात याचिका दाखल करणे आवश्यक होते. मात्र लवाद नेमून ही याचिका मागे घेण्याबाबत मनपाने संबंधित कंपनीला विनंती केली आहे. यावरून मनपा प्रशासन वॉटरग्रेस बाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांची ही भागीदारी

मनपात सत्तांतर झाले असले तरी प्रवृत्ती मात्र तीच आहे. या ठेक्यात भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांची देखील भागीदारी असून, मनपातील अनेक नगरसेवक पंधरा हजार रुपये घेऊन वॉटरग्रेस बाबत चुप्पी साधून आहेत. तर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी वॉटरग्रेसचे कंपनीचे वकील म्हणूनच काम करत असल्याचाही आरोप ॲड. विजय पाटील यांनी केला आहे.

Web Title: This is the participation of the Commissioner along with all party corporators in the contract of Watergrass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.