पहूर रुग्णालयात तब्बल महिनाभरानंतर रुग्णसेवा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:25+5:302021-09-23T04:18:25+5:30
यामुळे रुग्णांची परवड थांबली आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती केली असून, पुन्हा दोन डॉक्टर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हा ...

पहूर रुग्णालयात तब्बल महिनाभरानंतर रुग्णसेवा सुरळीत
यामुळे रुग्णांची परवड थांबली आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती केली असून, पुन्हा दोन डॉक्टर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात १८ ऑगस्टपासून रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णसेवा खंडित होती. यामुळे गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांची परवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आपत्कालीन व अपघातग्रस्त रुग्णांवर प्राथमिक उपचार होत नसल्याने रुग्णांच्या जिवावर बेतल्याचे पाहावयास मिळाले आहे, तर शवविच्छेदनासाठी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात न्यावा लागत असल्याने गैरसोय झाली आहे. गावात साथीच्या आजाराने थैमान घातल्याने घराघरांत रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांना खाजगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना हे परवडणारे नसल्याने उपचारापासून काही रुग्ण वंचित राहिल्याचे दिसून आले. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सूर्यवंशी यांची नियुक्ती केली असून, त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांना कायम नियुक्ती दिली आहे, तसेच दोन डॉक्टर कंत्राटी पद्धतीने नियुक्त होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी शनिवारी वैद्यकीय सूत्रे हातात घेतल्याने रुग्णसेवा सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.