लसीकरणाची कासवगती, प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:46+5:302021-07-28T04:16:46+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पुरेशी लसीकरण केंद्रे, नागरिकांचा लसीकरणाला मोठा प्रतिसाद असताना लसींचा साठा मुबलक ...

लसीकरणाची कासवगती, प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात पुरेशी लसीकरण केंद्रे, नागरिकांचा लसीकरणाला मोठा प्रतिसाद असताना लसींचा साठा मुबलक उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम अगदीच कासवगतीने सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत केवळ पाच टक्केच नागरिकांचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. अशीच स्थिती राहिल्यास सर्वांचे दोन्ही डोस पूर्ण होण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागू शकतो.
कोविशिल्ड लसीचा जिल्हाभरात पहिला डोस मिळत नसल्याने आता कोव्हॅक्सिनचा डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. अन्य केंद्रे वगळता शहरातील चेतनदास मेहता केंद्रावरच अचानक गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात ३५० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे असूनही यात लसींचा साठा पुरेसा नसल्याने अनेक केंद्रे बंद राहत आहेत. तर कधी कधी सर्वच केंद्रांवर अगदी मोजकाच साठा दिला जात आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी
एकूण : ३३०९२, पहिला डोस : ३०२९५, दुसरा डोस १९८४९ :
फ्रंटलाइन वर्कर
एकूण : ६३४४०, पहिला डोस ५९९१७, दुसरा डोस २०६३८
१८ ते ४४
एकूण : १९७८१५७, पहिला डोस : १५५६३७, दुसरा डोस १३२५१
४५ ते ६०
एकूण : ६९७६८१, पहिला डोस २२९०८४, दुसरा डोस ४९६७१
६० वर्षांवरील
एकूण : ५२३६२०, पहिला डोस २१२६१०, दुसरा डोस ७४५५२
केवळ वेटिंगच
१६ मार्च : दिवसाचे लसीकरण -१७७४, एकूण लसीकरण : ६९३८४
१ एप्रिल : दिवसाचे लसीकरण -२१८९, एकूण लसीकरण :१३६०८२
१५ एप्रिल : दिवसाचे लसीकरण -८५०२, एकूण लसीकरण :२२१२०९
१ मे : दिवसाचे लसीकरण -१७९०, एकूण लसीकरण :३०५१७२
१५ मे: दिवसाचे लसीकरण -१३२८, एकूण लसीकरण :४३८१४९
३ जून : दिवसाचे लसीकरण -७४४, एकूण लसीकरण :५२७५२८
१७ जून : दिवसाचे लसीकरण -९४४, एकूण लसीकरण :५९६९५६
२७ जुलै : दिवसाचे लसीकरण -५०५९, एकूण लसीकरण :९५१३८७
शहरातील ११ केंद्रांवर लसीकरण
शहरात लसींचा साठा कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने शहरातील महापालिकेची व रोटरी, रेडक्रॉस ही केंद्रे आठवड्यातून तीन दिवस बंद राहत आहेत. लस उपलब्ध असल्यानंतर शहरातील ११ केंद्रांवर लसीकरण होत आहे. दरम्यान, यातही आता चेतनदास मेहता या केंद्रावर कोव्हॅक्सिन घेण्यासाठी अधिक गर्दी होत आहे.
लसीकरण का वाढेना?
जिल्हाभरात ३५० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रासह आता उपकेंद्रांना डोस देऊन लसीकरण केले जात आहे. लसींचा साठा प्राप्त होताच तो तातडीने केंद्रांना पाठविला जातो व आलेल्या लसींमधून तातडीने लसीकरण केले जाते. मात्र, लसींचा साठाच अगदी मर्यादित येत आहे. आपण तो बरोबरीने सर्व केंद्रांना देत असतो. लसींचा साठा पुरेसा नसल्यानेच लसीकरणाची गती कमी झाली आहे.
- डॉ. समाधान वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी
पहिलाच डोस मिळेना
पहिल्या डोससाठी आम्ही गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन बुकिंग करून स्लॉट शोधतोय. मात्र, तो उपलब्धच होत नसून केंद्रावर गेल्यावर गर्दीमुळे लस मिळत नाही. ऑनलाइन व ऑफलाइनच्या घोळात तासनतास थांबूनही लस मिळत नसल्याने पहिलाच डोस मिळत नसल्याने आता करायचे काय? - प्रवीण चौधरी
कोविशिल्ड लसीचा पहिला डोस बंद करण्यात आल्याने आम्हाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोव्हॅक्सिनची नोंदणी होत नसून त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. लस उपलब्ध नसल्याचे आम्हाला सांगितले जाते. अशा स्थितीत आता पहिलाच डोस अद्याप आम्हाला मिळालेला नसून दुसरा डोस तर अद्याप खूप दूर आहे. त्यामुळे पूर्ण लसीकरण होणार कसे? - मनीष सोनवणे