शहरातील रस्ते दुरुस्तीसह इतर कामांचे होणार ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:51+5:302021-07-23T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली असून, मनपाने पावसाळ्याचा तोंडावर केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचेही ...

शहरातील रस्ते दुरुस्तीसह इतर कामांचे होणार ऑडिट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली असून, मनपाने पावसाळ्याचा तोंडावर केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचेही पहिल्या पावसातच पितळ उघडे पडले होते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या दुरुस्तीच्या कामात गुणवत्तेचा अभाव दिसून येत असल्याने मनपाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी येत्या काही महिन्यात शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामासह, नाल्यावरील संरक्षण भिंती व दुभाजकांच्या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याच्या तयारीत आहे.
अनेक दिवसांपासून शहरात मनपांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यातच रामदास कॉलनी परिसरात काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेली नाल्याची संरक्षण भिंतदेखील कोसळली होती. तर सद्यस्थितीत शहरातील दुरुस्त केलेल्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे मक्तेदारांनी केलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मनपाकडून सर्व कामांचे ऑडिट केले जाणार आहे. याबाबत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चादेखील केली आहे.
ऑडिटसाठी त्रयस्थ संस्थेला नेमणार
मनपाकडून लवकरच या शहरातील कामांचे ऑडिट करण्यात येणार आहे. हे ऑडिट एका त्रयस्थ संस्थेला दिले जाणार आहे. तसेच यासाठी मनपातील काही अधिकारी देखील नेमण्यात येणार आहेत. ऑडिटनंतर ज्या मक्तेदारांचे काम दर्जाहीन आढळून येणार अशा ठेकेदारांसह मनपा अभियंत्यावरदेखील कठोर कारवाई करण्याचे संकेतदेखील आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी गेला पाण्यात
१. महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत शहरातील रस्त्यांचा दुरुस्तीच्या कामांसाठी प्रभागनिहाय प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे एकूण ९ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. त्यानुसार शहरात केवळ ४ ते ५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.
२. अनेक ठेकेदारांना कार्यादेश देऊनदेखील आपल्या प्रभागात मुदत संपूनदेखील कामांना सुरुवात केली नाही. तर ज्या ठेकेदारांनी कामे केली आहेत. त्या कामांची गुणवत्ता पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. मनपाने रस्ते दुरुस्तीसाठी दिलेला ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी अक्षरश: पाण्यात गेला आहे.
कोट..
शहरात पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम अनेक ठिकाणी सुरूच झाले नाही. तर अनेक ठिकाणी झालेल्या कामाची गुणवत्तादेखील खराब आहे. अशा कामांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. सुमार दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना आता चाप बसणे गरजेचे आहे.
- नितीन लढ्ढा, माजी महापौर