भिंतीच्या कमी उंचीमुळे वाचल्या इतर महिला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:20+5:302021-07-01T04:13:20+5:30

बिडगाव, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथे मंगळवारी काही महिला बांधकामाच्या ओट्यावर बसल्या असता ओट्यासह भिंत कोसळून ...

Other women who survived because of the low height of the wall ... | भिंतीच्या कमी उंचीमुळे वाचल्या इतर महिला...

भिंतीच्या कमी उंचीमुळे वाचल्या इतर महिला...

बिडगाव, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथे मंगळवारी काही महिला बांधकामाच्या ओट्यावर बसल्या असता ओट्यासह भिंत कोसळून एक महिला जागीच ठार झाली, तर तब्बल सहा महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही भिंत कमी उंचीची असल्यामुळे उर्वरित महिला बचावल्या, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

भिकन दमड्या पावरा यांच्या ओट्यावर महिला बसल्या व ओट्यासह घराची भिंत पडून होत्याचे नव्हते झाले. जेलीबाई परशुराम बारेला यांना जीव गमवावा लागला. ज्या ओट्यावर या महिला बसल्या होत्या, तो आठ फूट लांब व तीन फूट रूंद असूनही त्याच्यात लोखंडी सळ्यांचे लेंटर न टाकताच बांधकाम केले होते व त्यामुळेच तो कोसळला. पण त्याच ओट्यावरील जी भिंत कोसळून महिला जागेवरच ठार झाली, ती भिंत अवघ्या तीनच फुटांची होती, अन्यथा यापेक्षाही मोठी घटना घडली असती व अनेक महिलांना जीव गमवावा लागला असता.

अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असलेल्या महिलांच्या अंगावर बांधकामाची भिंत कोसळून एक जागीच ठार, तर सहा महिला जखमी झाल्याची गंभीर घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी. ए. कोसोदे, ग्रामविस्तार अधिकारी जे. पी. पाटील, नायब तहसीलदार महेश साळुंखे, तलाठी सरोवर तडवी यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. मयत व जखमींच्या कुटुंबाना धीर दिला. मात्र, गावासाठी नेमणूक असलेले ग्रामसेवक राजेश सोनार हे गावाकडे फिरकलेच नाहीत.

सरपंचांची समयसुचकता पण... डॉक्टरांची गैरहजेरी

गावात घटना घडली, तेव्हा पावरा समाजातील सर्वच पुरूष मंडळी प्रेतयात्रेत गेले होते. मात्र, या घटनेमुळे एकच धांदल उडाली. अशात येथील सरपंच भूषण पाटील यांनी समयसुचकता दाखवत जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून आपल्या मालकीच्या चारचाकी गाडीत टाकून स्वतः व सदस्य रवींद्र पाटील यांना घेऊन उपचारासाठी तत्काळ धानोरा आरोग्य केंद्रात स्वतः गाडी चालवत नेले. मात्र, तेथे एकही डॉक्टर उपस्थित उपस्थित नसल्याने जखमींना उपचारासाठी ताटकळत राहावे लागले. शेवटी स्थानिक आरोग्यसेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी ‌त्यांना प्राथमिक उपचार करून जळगावला पाठवून दिले.

मी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आलोय. पंचनामाही झाला असून, ज्या योजनेतून शक्य असेल, त्या योजनेनुसार मयताच्या वारसदारांना मदत देण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Other women who survived because of the low height of the wall ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.