मृत्यूचे तांडव ; शहरात एकाच दिवसात सहा रूग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST2021-03-25T04:16:55+5:302021-03-25T04:16:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव पुन्हा सुरू झाले आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल १३ बाधितांचा बळी ...

Orgy of death; Six patients died in a single day in the city | मृत्यूचे तांडव ; शहरात एकाच दिवसात सहा रूग्ण दगावले

मृत्यूचे तांडव ; शहरात एकाच दिवसात सहा रूग्ण दगावले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव पुन्हा सुरू झाले आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल १३ बाधितांचा बळी गेला. यामध्‍ये सर्वाधिक सहा मृत जळगाव शहरातील आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात नवीन १२२३ तर शहरात २४८ कोरोना बाध‍ित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला असून आता तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक असताना सुध्दा नागरिक ‘बिनधास्त’ असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय तीव्र स्वरूपात पसरत आहे. दुस-या लाटेत जशी रूग्ण संख्‍या वाढत आहे. तशीच मृत्यू होणा-यांचेही प्रमाण वाढत आहे. चार ते पाच दिवसांपासून दररोज आठ ते दहा बाधित रूग्णांचा बळी जात आहे. मंगळवारी १२ तर बुधवारी जिल्हयात १३ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बळीचा आकडा हा १५२६ एवढा झाला आहे. बुधवारी शहरात ६ बाधितांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ३५, ५३, ६५,७२ वर्षीय पुरूष व ७४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे, भुसावळ तालुक्यात दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात २० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

९०८ बाधितांची कोरोनावर मात

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्‍या वाढत असली तरी, बरे होणा-यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. बुधवारी जिल्ह्यात १२२३ रूग्ण आढळून आले असले तरी ९०८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्‍यात आला आहे. शहरात सुध्‍दा २४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहे, पण दुसरीकडे २३५ जण कोरोनाला हरवून घरी परतले आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या ही आता ८० हजार ७८६ वर पोहोचली आहे तर एकूण बरे होणा-यांची संख्‍या ६८ हजार ९८१ एवढी आहे. आतापर्यंत जळगाव शहरात २१ हजार ९७५ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १८ हजार ६१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर ३५५ बाधितांचा मृत्यू झाला असून ३ हजार ७ बाधितांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

१० हजार २७९ बाधितांवर उपचार सुरू

सद्यस्थितीला जिल्ह्यातील १० हजार २७९ बाधितांवर उपचार सुरू आहे. यामध्‍ये ७ हजार ८३१ लक्षणे नसलेली तर २ हजार ४४८ लक्षणे असलेली रूग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ८५.३९ टक्क्यांवर पोहोचला असून बुधवारी मृत्यू दर १.८९ टक्के होता. अजूनही ३५४ अहवाल प्रलंबित आहेत.

१४२ ॲक्टीव कंटेनमेंट झोन

जिल्ह्यात १४२ ॲक्टीवर कंटेनमेंट झोन आहेत. ग्रामीण क्षेत्रात ६०, शहरी क्षेत्रात ५२ तर मनपा क्षेत्रात ३० आहेत. एकूण १५२६ बाधित मृतांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींचा समावेश असून ती संख्‍या १३५४ एवढी आहे.

ओटू टॅंकमध्ये पुरेसा पुरवठा

जीएमसीत ओटू टॅंक व सिलेंडर या दोघांद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मुख्य इमारतीत पाइपलाईन असल्याने टॅंकद्वारे पुरवठा होतो तर इतर वॉर्डात सिलेंडरद्वारे पुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण रुग्णालय कोविड झाल्याने व सर्व वॉर्ड सुरु झाल्याने रुग्ण संख्या देखील वाढायला लागली आहे. ही परिस्थिती पाहता रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करता यावा यासाठी बुधवारी ओटू टॅंकमध्ये १३ किलो लिटर लिक्विड भरण्यात आले तर सिलेंडरचा देखील मुबलक साठा असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिली.

गरोदर माता पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले

दरम्यान, दुसऱ्या लाटेत गरोदर माता पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बाळांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जीएमसीत एएनसी वॉर्ड हा कोरोना बाधित गरोदर मातांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बाधित गरोदर महिलांची फिरवाफिरव नको व्हायला म्हणून ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी २५ बेड तयार करण्यात आले आहे.

डॉक्टर रुजू

जीएमसीमधील ५० हुन अधिक डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी बाधित झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर जे रुग्ण बरे झाले आहे. त्यांनी सेवा द्यायला सुरवात केली आहे. बुधवारी बाधित डॉक्टरांपैकी एक तर राज्यातील प्रतिनियुक्तीतील डॉक्टरांपैकी २ डॉक्टर रुजू झाले आहे. त्यामुळे आता प्रतिनियुक्तीतील १० तर बाधित डॉक्टरांपैकी ८ डॉक्टर आतापर्यंत रुजू झाले आहे.

कर्तव्यावर तात्काळ रूजू व्हा

जे अधिकारी व कर्मचारी अर्जित राज, वैद्यकीय रजा तसेच किरकोळ रजेवर आहेत. त्यांनी तात्काळ कर्तव्यावर रजू व्हावे, असे आदेश अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बुधवारी काढले आहे. तथापि, जे कर्मचारी रजेवर राहतील, त्यांच्यावर कारवाई करण्‍यात येईल,असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: Orgy of death; Six patients died in a single day in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.