लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सागर पार्कचे जॉगिंग ट्रॅकचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबतची तक्रार महापौरांकडे आल्यानंतर हे काम पुन्हा नव्याने करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून, मनपा निधीअंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत करणाऱ्या ठेकेदाराला देखील महापौरांनी काळा यादीत टाकण्यात आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
शहरात अनेक विकास कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. मात्र अनेक कामांबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी येतात. मात्र आतापर्यंत संबंधित ठेकेदारावर कोणतीही मोठी कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, आता महापौरांनी शहरातील कामांबाबत कोणतीही तक्रार आल्यास याबाबत गांभीर्याने विचार करून ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असा इशारा शहरातील सर्व ठेकेदारांना दिला आहे. शहरातील सागर पार्क येथे जॉगिंग ट्रॅक चे काम गेल्या महिनाभरात सुरू आहे. मात्र हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी व नगरसेवक नितीन बरडे यांनी केला होता. याबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व महापौर जयश्री महाजन यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत महापौरांनी बुधवारी सागर पार्क मैदानावर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली होती. पाहणी दरम्यान हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर हे काम पुन्हा नव्याने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सागर पार्कच्या जॉगिंग ट्रॅकवर लावण्यात आलेले पेवर ब्लॉक काढून नव्याने बसवण्याचे काम सुरू झाले होते.
रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने ठेकेदाराला पाच वर्षासाठी टाकले काळया यादीत
प्रभाग क्रमांक १३ मध्ये मनपा निधीअंतर्गत मुख्य डांबरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चाळीसगाव येथील पी.एस. कुमावत या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यानुसार हे काम कार्यादेश दिल्यापासून पंधरा दिवसाचा आत सुरू करणे अपेक्षित होते. मात्र पाच महिने होऊन देखील हे काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदाराला पाच वर्षासाठी काळया यादीत टाकण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी दिले होते. त्यानुसार शहर अभियंता यांनी गुरुवारी संबंधित ठेकेदाराला बाबतची नोटीस बजावली आहे.