माजी राष्ट्रपतीच्या भावास खून प्रकरणात आरोपी करण्याचा आदेश
By Admin | Updated: July 8, 2014 10:36 IST2014-07-08T10:36:13+5:302014-07-08T10:36:25+5:30
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा.व्ही.जी. पाटील खून खटल्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे कनिष्ठ बंधू डॉ.जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

माजी राष्ट्रपतीच्या भावास खून प्रकरणात आरोपी करण्याचा आदेश
न्यायालयाचे आदेश : आरोपींची संख्या आता सहा, दोघांचे पत्ते मागवले, १0 रोजी सुनावणी
जळगाव : काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा.व्ही.जी. पाटील खून खटल्यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे कनिष्ठ बंधू डॉ.जी.एन. पाटील यांनाही आरोपी करण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण आदेश जळगावचे अतिरिक्त सत्र न्या.डी.जे. शेगोकार यांनी ७ रोजी सायंकाळी दिला.
आदेशाची प्रमाणित प्रत १-२ दिवसात उपलब्ध होईल. त्यात प्रथमदर्शनी कोणता पुरावा न्यायासनाने ग्राह्य धरला, हे कळू शकणार आहे. पुढील सुनावणी १0 जुलैला होणार आहे. डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील या दोघांचे पत्ते व वय याबाबतचा तपशील फिर्यादी प्रा.रजनी पाटील यांनी न्यायालयाला सादर करायचा आहे. परिणामी साडेआठ वर्षापासून प्रलंबित खटल्याच्या कामकाजाला गती येण्याची शक्यता आहे. आधीच्या चारपैकी एक आरोपी राजू माळी हा कारागृहात असताना मरण पावला आहे तर दुसरा आरोपी राजू सोनवणे हा कारागृहात आहे. अन्य दोघा आरोपींमध्ये दामोदर लोखंडे, लीलाधर नारखेडे यांचा समावेश आहे. न्यायालयात लोखंडे व नारखेडे यांच्यासह त्यांचे वकील अँड.एस.के.कौल, रजनी पाटील यांचे सुपुत्र प्रणव पाटील, अँड. सुदर्शन साळुंखे (औरंगाबाद), सी.बी.आय.चे अँड. निखिल कुलकर्णी (जळगाव) न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, प्रा.रजनी पाटील तसेच डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही..
२१ सप्टेंबर २00५ पासूनचा लढा
- राजकीय वैमनस्यापोटी कट रचून २१ सप्टेंबर २00५ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गालगत मानराज पार्कसमोर हेल्मेटधारी आरोपींनी तलवारीने हल्ला करुन प्रा.व्ही.जी. पाटील यांचा खून केल्याचा आरोप आहे.
- न्यायालयाच्या आदेशामुळे आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ (खून) व १२0 ब (कट रचणे) आदीनुसार हा गुन्हा दाखल आहे.
- सुरुवातीपासूनच प्रा.रजनी पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याची मागणी केली होती.
- या मागणीसाठी त्यांनी १९ डिसेंबर २00९ रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
- राजू सोनवणे याने अटकेनंतर पोलीस उपअधीक्षक शांताराम गायकवाड यांना डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन. पाटील यांचे घर दाखवले होते.
- आतापर्यंत या खटल्यात सरकारपक्षातर्फे रजनी पाटील, श्रीधर चौधरींसह ४६ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.
आदेशाची प्रत अद्याप हाती पडलेली नाही. बहुधा ९ रोजी ती मिळेल. त्यानंतरच सीबीआय खंडपीठात दाद मागायची काय?..ते ठरवू. -अँड.निखिल कुलकर्णी, सीबीआयचे वकील
सी.बी.आय.सह अनेक पक्ष खंडपीठात दाद मागतील, असे वाटते. त्यामुळे आरोपी राजू सोनवणेच्या दृष्टीने न्याय मिळायला विलंब होणार आहे. अन्य चौघांवर दोषारोप ठेवला जायचा आहे. -अँड.एस.के.कौल