संवेदनशील शहराचा शिक्का पुसण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:21+5:302021-09-07T04:22:21+5:30
६ रोजी शरदचंद्रिका सुरेश पाटील नगरपालिका नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता शहर पोलीस स्टेशन गणेशोत्सव शांतता समितीची बैठक पोलीस ...

संवेदनशील शहराचा शिक्का पुसण्याची संधी
६ रोजी शरदचंद्रिका सुरेश पाटील नगरपालिका नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता शहर पोलीस स्टेशन गणेशोत्सव शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, नगराध्यक्षा मानीषा चौधरी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, नगरसेवक भूपेंद्र गुजराथी, तहसीलदार अनिल गावित, गटनेते जीवन चौधरी, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, चोसाका माजी चेअरमन घनश्याम पाटील, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, सहायक पोलीस निरीक्षक अमर वसावे, नगरसेवक राजू देशमुख आदींची उपस्थिती होती.
मुंढे पुढे म्हणाले की, चोपडावासीयांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. शहर सांस्कृतिक जडणघडण सुंदर आहे. आर्थिक सुबत्ता आहे. मात्र मुंबई, पुणेनंतर सर्वात जास्त चर्चेची चोपडा येथील मिरवणूक असते. संवेदनशील भागात विकासकामे मागे पडतात. सकारात्मक दृष्टिकोनाचा पायंडा पाडा, पोलीस खाते नसले तर इतर खाते चालतील का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
तालुक्यातील गणपती मंडळांच्या अध्यक्षांना सूचित करताना डॉ. मुंढे यांनी सांगितले की, यावर्षीसुद्धा कोरोना प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने कुठल्याही मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही. तसेच सार्वजनिक व खाजगी गणपती बसवताना त्या मूर्तीची उंची ठरवून दिलेली आहे. डी. जे. डॉल्बी साऊंड यांच्यावर पूर्णपणे बंदी आहे. आपणास देखावे करायचे असल्यास कोरोना जागृती, समाजहित जोपासले जाईल, असेच आरास आपण करू शकता.
अरुणभाई गुजराथी यांचा न. प.ला घरचा आहेर
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी नगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, असा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या नगरपालिकेला घरचा आहेर देत कर्तव्याची जाणीव करून दिली.
सेनेचे नगरसेवक नाराज
चोपडा शहर पोलीस आयोजित नाट्यगृहातील शांतता समितीच्या सभेत वेगळेच नाट्य अनुभवास आले. व्यासपीठावर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केल्याने शिवसेनेने आपली तीव्र नाराजी पत्रकारांकडे व्यक्त केली. हा कार्यक्रम पोलीस प्रशासनाचा की राष्ट्रवादीचा? असा सवाल विचारत आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो, अशी अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते महेंद्र धनगर, शहर प्रमुख आबा देशमुख यांनी दिली.
या बैठकीस तालुकाभरातून गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, नगरसेवक, महिला पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक व आभार चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन पी. सी. पाटील, प्रीती पाटील यांनी केले.