केवळ गट-तट वाढले, शहर आहे तिथेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 11:57 AM2020-08-03T11:57:15+5:302020-08-03T11:57:26+5:30

मनपात भाजपची द्विवर्षपूर्ती : वर्षभरात चेहरा बदलण्याचे आश्वासन विरले हवेत

Only groups grew, where the city is | केवळ गट-तट वाढले, शहर आहे तिथेच

केवळ गट-तट वाढले, शहर आहे तिथेच

Next

जळगाव : मनपात सत्तेवर असलेल्या भाजपला गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत शहराला विकासाच्या वाटेवर नेता आले नाही. भाजपला एक हाती सत्ता मिळवूनही शहराला त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट सत्ताधारी भाजपतच गट- तट निर्माण झाले आहे आणि त्याचा फटका शहर विकासला बसला. अनेक कोटींचा निधी आला पण त्याचा साधा विनियोगही सत्ताधाऱ्यांना करता आला नाही. परिणामी दोन वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे.


भाजपने जळगाव मनपात मिळविलेल्या ऐतिहासिक आणि एकहाती विजयास ३ आॅगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला सत्ता दिल्यास एक वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू, अशी गर्जना केली होती. परंतु राज्यात त्यांचीच असलेली सत्ता गेली त्यामुळे हे नेहमीप्रमाणे केवळ आश्वासनच ठरले.


२०१८ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपचे पहिल्यांदाच ५७ नगरसेवक विजयी झाले होते. यापूर्वी भाजपचा काही काळ सत्तेत सहभाग राहिला आहे. यापूर्वी भाजपचे डॉ. के.डी.पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. दोन वर्षापूर्वी राज्यात भाजपच्या बाजूने जोरदार वारे वाहत होते. त्यात जळगाव मनपाची जबाबदारी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली. सर्व सुकाणू आपल्या हातात घेऊन महाजन यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.


सुरुवातीला महापौरपदासाठी ११ महिन्याचा कालावधी ठरविण्यात आला. पहिल्या वर्षी महापौर म्हणून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची निवड झाली. यानंतर आता भारती कैलास सोनवणे ह्या महापौर आहेत. निवडणुकीपूर्वी जळगावात अनेकांनी भाजपची वाट धरली. अनेक नगरसेवकांना इतर पक्षातून भाजपात आणले गेले. काही जण स्वत:हून आले. यामुळे भाजप नगरसेवकांची संख्या थेट ५७ वर पोहचली. सत्ता मिळाली पण आज याच नगरसेवकांचे आता गट- तट निर्माण झाले आहेत. या सर्वाची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याची टीका होत असते.
यामुळेच की काय शासनाने दिलेले १०० कोटी रुपये अजूनही खर्च होवू शकले नाहीत. यासाठी निविदांचा बाजार मांडला जात आहे. या निविदाही आपल्याला मिळाव्यात, यासाठी खटाटोप केला जात आहे. तिसºयाला मिळाल्या तर निविदा पुन्हा काढल्या जात आहेत. पण हा सर्व खेळ नागरिकांच्या जीवाशी सुरु आहे.

एक वर्ष कशासाठी
-निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन यांनी एक वर्षात शहराचा चेहरा- मोहरा बदलून दाखवेल, असे आश्वासन दिले होते. यानंतर गेल्या वर्षी ३ आॅगस्ट २०१९ रोजी रोटरीतर्फे आयोजित चर्चासत्रात आमदार सुरेश भोळे यांनी शहरच्या विकासासाठी आपणास एक वर्ष द्या म्हणून अट घातली. दोघांनीही एक-एक वर्ष मागितले, यात दोन वर्षे गेली पण शहराचा विकास जैथे थेच आहे. किमान आता पुढच्या एक वर्षात तरी सत्ताधाऱ्यांना जाग यावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. शहरात सुरु असलेली विकास कामे थांबली आहेत. पण त्याविषयी सत्ताधारी काहीच बोलायला आणि कार्यवाही करण्यासाठी तयार नाहीत, शहरासाठी ही दुर्देवाची बाब आहे. या दोन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडीयावरही सत्ताधाºयांविषयी टिंगलटवाळी सुरु झाली आहे.

‘क्या हुआ तेरा वादा...’
शिवसेनेने तर क्या हुआ तेरा वादा असा फलक सोशल मीडीयावर झळकविला आहे. यात वर्षभरात विकास केला नाही तर विधानसभेत मते मागणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाल्याचा त्यात उल्लेख आहे. भाऊ, मामा जरा यावरही बोला असे सांगत कामांची जंत्रीच देण्यात आली आहे.

Web Title: Only groups grew, where the city is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.