Online exams continue in schools so that studies are not interrupted | अभ्यासात खंड पडू नये म्हणून शाळांमध्ये ऑनलाइन परीक्षा सुरूच

अभ्यासात खंड पडू नये म्हणून शाळांमध्ये ऑनलाइन परीक्षा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्‍याचा निर्णय नुकताच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला असला, तरी सुध्दा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता टिकून रहावी व त्यांचा अभ्यासात खंड पडू नये म्हणून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शाळांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा जवळपास बंदच आहेत. अजूनही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झाले नाहीत. तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरू केल्या होत्या. केवळ, ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गुगलच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले होते. दरम्यान, देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे आवश्यक असते. मात्र, यंदा ते शक्य नाही. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

३ लाख मुलांचा तर २ लाख मुलींचा समावेश

जळगाव जिल्ह्यातील ३ हजार ३१९ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमध्‍ये ६ लाख २३ हजार ९९६ विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना सरसकट पास निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यात ३ लाख ३९ हजार ४६ मुलांचा तर २ लाख ८४ हजार ९५० मुलांचा समावेश आहेत.

काय आहे हेतू

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने परीक्षा जरी रद्द केल्या असल्या तरी काही शाळांमधून परीक्षा ह्या घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, यासोबतचं लेखन कौशल्यातील सातत्य टिकून रहावे, त्याचबरोबर जरी विद्यार्थी पुढल्या वर्गात गेला असला तरी त्याच्या बौध्दिक क्षमता, स्तर त्याच्या लक्षात येण्याकरिता मूल्यमापन आवश्यक आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षातील आव्हांनाना खंबीरपणे व आत्मविश्वासाने उभ राहता यावे. ऑनलाइन परीक्षेतील गुगुल फॉर्ममुळे अचूक योग्य पर्याय निवडणे, यातून स्पर्धा परीक्षांची तयारी सुध्दा आघाने करता येत आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखत टेक्नॉलॉजीचा सुयोग्य वापर विद्यार्थी अनुभवत आहेत, अशी ऑनलाइन परीक्षांमागील भूमिका एका शिक्षकाने स्पष्ट केली.

मूल्यमापन हा शिक्षणाचा जर अविभाज्य घटक आहे तर आणि शाळा बंद, शिक्षण सुरू हे जर सूत्र आहे तर शाळांनी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा घेणे योग्यच म्हणायचं. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी त्या त्या विषयांचा अभ्यास करत ऑनलाइन पध्दतीने वा व्हॉट्सॲपद्वारे जर परीक्षा दिल्या तर त्यांनाही आपले मूल्यमापन होतेय, हे कळते. व पुढील इयत्तेच्या अभ्यासात त्यांना निश्चित फायदा होईल.

- चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ

सरसकट पास होणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या

तालुका विद्यार्थी संख्या

अमळनेर ४२८२६

भडगाव २३८७२

भुसावळ ४७०७७

बोदवड १२१८०

चाळीसगाव ६८८९६

चोपडा ४८१४९

धरणगाव २४८०६

एरंडोल २३८६३

जळगाव ग्रामीण ३४१७३

जळगाव शहर ७०३५२

जामनेर ५४१४७

मुक्ताईनगर २२९९८

पाचोरा ३३४४९

पारोळा २९६६३

रावेर ४३१५०

यावल ३५५०५

Web Title: Online exams continue in schools so that studies are not interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.