ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने मुलांनाही लावला चष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:43+5:302021-07-18T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आकाश नेवे जळगाव : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यात वर्षभरापेक्षा जास्त काळापासून ...

ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने मुलांनाही लावला चष्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
आकाश नेवे
जळगाव : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यात वर्षभरापेक्षा जास्त काळापासून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. त्यामुळे आता लहान वयातच मुलांना डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक लहान मुलांना डोळ्यांमध्ये पाणी कमी होणे, दृष्टिदोष निर्माण होणे, अशा समस्या समोर येत आहेत.
मार्च २०२० मध्ये देशात कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला. त्यानंतर हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच गेली. सुरुवातीला शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. आधी ऑनलाइन परीक्षा आणि नंतर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. लहानग्यांचे शिक्षण हे मोबाइल आणि लॅपटॉप, टॅबमधून सुरू झाले. वर्ग सुरू असताना मोबाइलमध्ये लक्ष द्यावे लागते. नंतर टीव्ही बघणे, काॅम्प्युटर गेम्स खेळणे यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. यामुळे मुलांच्या डोळ्यांची उघडझाप कमी होते. त्यामुळे डोळे कोरडे पडतात. काही मुलांमध्ये दृष्टिदोषदेखील निर्माण होतो.
लहान मुलांना हे धोके
- सतत मोबाइल, काॅम्प्युटर, टीव्हीच्या स्क्रीनकडे पाहिल्याने लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली आहे.
- लहान मुलांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुलांना चष्मा लागू शकतो.
- डोळे कोरडे होणे, डोळ्यात पाणी येणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत.
- स्क्रीन डोळ्यांच्या रेषेच्या वर असल्याने मान आणि पाठ दुखू शकते.
लहान मुलांमध्ये वाढली डोकेदुखी
लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्याने त्यासोबत उद्भवणारी डोकेदुखीदेखील वाढली आहे. कोरोनाच्या काळात घरातच राहावे लागत असल्याने आधी ऑनलाइन शाळेचे चार ते पाच तास, नंतर मोबाइल किंवा काॅम्प्युटर गेम्स, त्यानंतर कुटुंबासोबत टीव्ही पाहणे, यामुळे मुलांमध्ये डोकेदुखी वाढली आहे. स्क्रीन टाइम कमी करणे, हा त्यावरील एकमेव उपाय आहे.
स्क्रीन टाइम कमी करा, डोळ्यांची काळजी घ्या
मुलांनी ऑनलाइन शाळा किंवा क्लासेस झाल्यानंतर उगाचच मोबाइल, टीव्ही किंवा काॅम्प्युटरचा वापर करू नये, त्याऐवजी घरातच इतर बैठे खेळ खेळावेत, कुटुंबासोबत वेळ घालवावा. तसेच २०-२०-२० हा फॉर्म्युला वापरावा. दर २० मिनिटांनी २० फूट दूर बघायचे आणि २० वेळा पापण्यांची उघडझाप करायची. त्यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते.
- डॉ. धर्मेंद्र पाटील.
मुलांच्या डोळ्यांची काळजी वाटते
मुलांची शाळा ऑनलाइन, क्लासेस ऑनलाइन सुरू आहेत. त्याशिवाय आम्ही घरात मुलांना मोबाइल देणे टाळतो. मात्र, तरीही मोबाइल किंवा टॅबचा उपयोग जास्त होत असल्याने त्यांच्या डोळ्यांची काळजी वाटते.
- विकी जोशी, पालक
मुलांना शाळेसाठी मोबाइल द्यावा लागतो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची भीती वाटते. शक्य तेवढे मोबाइल, काॅम्प्युटर किंवा टीव्हीपासून मुलांना लांब ठेवण्याच्या प्रयत्न असतो. मुले सतत घरात असल्याने टीव्हीदेखील बघतात.
- सचिन महाजन, पालक.