कांद्याचा बसेना मेळ अन् टोमॅटोचा झाला खेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:18+5:302021-09-23T04:18:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाघडू, ता. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून ...

कांद्याचा बसेना मेळ अन् टोमॅटोचा झाला खेळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाघडू, ता. चाळीसगाव तालुक्यातील
शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते; पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसतील तर कांदा साठवणूक करायची कशाला, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे.
अडीच हजारांवर गेलेला कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी अकराशे ते बाराशे रुपये दराने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत सडत असल्याने याचा तोटाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली; पण हाच कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर होणार आहे. साठवून ठेवलेल्या कांद्याचे चार पैसे होतील व त्या पैशावर आपण पुढील पिके उभे करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तोंडचा घास पळाला आहे. पुढील पिके उभे करण्यासाठी आहे त्या भावाने कांदा विकावा लागत आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोतून बऱ्यापैकी पैसे मिळाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. एक एकर टोमॅटो पीक उभे करण्यासाठी एक लाख रुपयांच्या आसपास खर्च येतो. यामध्ये ड्रीप, बांबू, तार, मल्चिंग पेपर, सुतळी, मजुरी असा मोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांना आज मात्र या टोमॅटो पिकातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो पिकामध्ये नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर जनावरांचा चारा म्हणून टोमॅटोचा उपयोग केला आहे. एकूणच कांदा आणि टोमॅटोच्या आगारात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडले असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया
भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली; पण आता दिवसेंदिवस कांदा खराब होत असून, आधीच अडीच हजारांवर गेलेला कांदा अकराशे ते बाराशे रुपयांवर आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
-भगवान राठोड, कांदा उत्पादक शेतकरी