एक वर्ष उलटले तरी आदर्श शिक्षकांना पुरस्कार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:40+5:302021-09-05T04:20:40+5:30
अमळनेर : तब्बल वर्ष उलटून गेले तरी मागील वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्करांची यादी जाहीर होऊनही शिक्षक पुरस्कारापासून ...

एक वर्ष उलटले तरी आदर्श शिक्षकांना पुरस्कार नाही
अमळनेर : तब्बल वर्ष उलटून गेले तरी मागील वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्करांची यादी जाहीर होऊनही शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत.
कोरोनाचे निमित्त दाखवत पुरस्कारापासून लांब ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनात जोखमीचे काम शिक्षकांना देण्यात आले आणि अनेकांना कोरोना योद्धा पुरस्कारदेखील शासनातर्फे देण्यात आले. मात्र, समाज घडविणारा शिक्षक दुर्लक्षित होत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी मनीषा गोविंद चौधरी (शिरसाळे, ता. अमळनेर), सचिन हिलाल पाटील (पिंपळगाव बु., ता. भडगाव), समाधान रामचंद्र जाधव (शिंदी, ता. भुसावळ), मालती संजय तायडे (बोदवड), संजीव सीताराम थेटे (चौगाव, ता. चोपडा), गोरख मोतीराम वाघ (चौगाव, ता. चाळीसगाव), ज्योती लीलाधर राणे (साळवे, ता. धरणगाव), विनायक गोकुळ वाघ (खेडी बु. ता. एरंडोल), सुनील भागवत चौधरी (पाथरी, ता. जळगाव), नथू धनराज माळी (चिंचखेडे बु., ता. जामनेर), वैशाली अशोक नांद्रे (बोळे तांडा, वसंतनगर, ता. पारोळा), किशोर अभिमन पाटील (वडगाव बुद्रुक, ता. पाचोरा), सुशीला वसंत हडपे (मुक्ताईनगर), कल्पना दिलीप पाटील (निंबोळ, ता. रावेर), विनोद मनोहर सोनवणे (डांभुर्णी, ता. यावल) या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मंजुरीची यादी विभागीय आयुक्त नाशिक यांनी ४ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर केली आहे. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना पुरस्कार वितरित करण्यात आलेला नाही.
एकीकडे जिल्हा परिषदेची सभा होते. शिक्षकांना गर्दीत, कंटेन्मेंट झोनमध्ये सर्वेक्षणाला नेमण्यात आले. त्यावेळी कोरोनाचा धोका अधिक असतो. मात्र, अवघ्या १५ जणांना पुरस्कार देताना कोरोनाच्या अडचणी दाखवल्या गेल्या. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका, महसूल विभागाचे कार्यक्रम, त्यांचे कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार सोहळे, महसूल दिनाचे कार्यक्रम बिनधास्त झाले. त्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांचे बंधन अथवा नियम नव्हते; परंतु शिक्षकांच्या मनाचे खच्चीकरण केले गेले. शिक्षकांचा फक्त वापर केला गेला. वेळेची शिस्त लावणाऱ्या शिक्षकाला पुरस्कारासाठी विलंब व्हावा यापेक्षा सर्वांत मोठे दुःख कोणते असावे? अशा भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत.