प्रहारकडून भूमिपूजन
मोहन सारस्वत/ लियाकत सय्यद
जामनेर : रांजणी (ता. जामनेर) येथील निराधार सुपडाबाई मगरे हिला घर बांधून देण्याचे आश्वासन प्रहार संघटनेने दिले होते. मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या हस्ते नुकतेच घर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि ज्यासि अपंगिता पाही.. त्यासी धरी जो हृदयी... या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळीची सर्वांना अनुभूती आली.
लोकमतने सुपडाबाईच्या व्यथा समाजासमोर मांडल्याने मदतीचा ओघ सुरू झाला होता आणि तिचे हक्काचे घरही उभे राहत आहे.
निराधार सुपडाबाई मगरे ही शंभर टक्के अपंग आहे. घरात एकटीच असते. तिला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नव्हता. लोकमतने सर्वप्रथम तिच्या असहायतेविषयी वाचा फोडली.
अपंगत्व असूनही केवळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड व मतदान ओळखपत्र नसल्याने घरकूल योजना, संजय गांधी निराधार योजना आदी लाभ मिळत नसल्याने तिला कष्टाचे जीवन जगावे लागत होते. सोबत असलेल्या आईमुळे ती कसेबसे जीवन जगत आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तिची वेदना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहचवली. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्न व लोकमतच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासन यंत्रणा जागी झाली.
आधार कार्डासाठी सुविधा केंद्र चालक तिच्या घरी पोहोचला. तिला संजय गांधी निराधार योजनेतून मासिक मानधन तहसीलदारांनी मंजूर करून दिले. याशिवाय ग्रामपंचायतीने रमाई योजनेतून घरकूल मिळावे, यासाठी या महिलेच्या नावाचा प्रस्ताव पाठविला.
लोकमतने सुपडाबाई मगरे हिची व्यथा समाजासमोर मांडल्यानंतर मदतीचा ओघ सुरूझाला. प्रहार संघटनेने तिला घरकूल बांधून देण्याचे वचन दिले होते. वचनपूर्ती होत असल्याचा आनंद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
रांजणी येथे झालेल्या भूमिपूजनप्रसंगी विजय भोसले, रांजणी येथील सरपंचपती दगडू सपकाळे, ग्रा.पं. सदस्य महेश अहिर, जामनेर युवा तालुका प्रमुख मयूर पाटील, जामनेर शहर अध्यक्ष शिवा माळी, देवा महाजन, मनोजकुमार महाले, नीरज खैरनार, उमेश कोळी, भूषण सोनवणे, विशाल हिवाळे, सचिन दीपक उंबरकर, भूषण कानडजे, दशरथ पाटील, राहुल मुळे, शिवम माळी, अक्षय कोकाटे, राधेश्याम कोळी, निलेश दाभाडे, सचिन बोरसे, नितेश दारकुंडे उपस्थित होते.
फोटो ओळी- रांजणी, ता. जामनेर येथील सुपडाबाई मगरे हिच्या घराच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी प्रहार संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ.