युवकाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप
By Admin | Updated: January 20, 2016 00:50 IST2016-01-20T00:50:57+5:302016-01-20T00:50:57+5:30
वर्षभरात निकाल : लग्नात नाचण्याचा वाद

युवकाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप
धुळे : लग्नात नाचण्याच्या वादातून वाजंत्री पथकातील अजय पावरा या युवकाच्या खूनप्रकरणी मांजरबर्डी, ता.शिरपूर येथील आरोपी दादू पावरा याला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. घुगे यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. घटनेनंतर वर्षभरातच हा खटला निकाली निघाला, हे निकालाचे वैशिष्टय़ ठरले. हे भांडण सोडवण्यासाठी आलेला प्रकाश काळू पावरा (रा.बुडकी खडी) याच्यावरदेखील दादूने वार केले होते. रुग्णालयात अजयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपी दादूविरुद्ध भादंवि कलम 302 व 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. खटल्यात जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता अॅड.श्यामकांत रावजी पाटील यांनी नोंदविलेल्या आठ जणांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दादू पावराला भादंवि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, दंडाअभावी सहा महिने शिक्षा तसेच भादंवि कलम 307 अन्वये सात वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. अशी घडली घटना बुडकीखडी, येथील अजय सुनील पावरा (वय 16) हा 1 जानेवारी 2015 रोजी लग्नात बॅण्ड वाजण्यासाठी मांजरबर्डीला गेलेला होता. त्या ठिकाणी रात्री ‘मांदल’ वाद्यात नाचण्याच्या कारणावरून आरोपी दादू उर्फ जयसिंग जंबो पावरा (40, रा.मांजरबर्डी) व अजय पावरा यांच्यात भांडण झाले. त्यात दादूने चाकूने अजयच्या छातीच्या बरगडीखाली वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.