तरसोद फाट्याजवळील विचित्र अपघातात एक ठार
By Admin | Updated: June 13, 2014 15:02 IST2014-06-13T15:02:52+5:302014-06-13T15:02:52+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळील गणपती मंदिर संस्थानच्या प्रवेशद्वारासमोर ट्रक, रिक्षा, रुग्णवाहिका आणि कारच्या विचित्र अपघातात दीपक १ ठार तर ३ जखमी झाले.

तरसोद फाट्याजवळील विचित्र अपघातात एक ठार
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळील गणपती मंदिर संस्थानच्या प्रवेशद्वारासमोर ट्रक, रिक्षा, रुग्णवाहिका आणि कारच्या विचित्र अपघातात दीपक अरुण पाटील(२२)रा.नशिराबाद हा युवक ठार झाला तर तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे बांभोरीपर्यंत दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हा अपघात गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाला.
भुसावळकडे जाणार्या भरधाव ट्रकने (ओ.आर.१५जे २८५८) जळगावकडे येत असलेल्या रिक्षाला (एम.एच.१९ व्ही १९२४) समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचा चुराडा झाला आणि उजव्या बाजूला असलेल्या जागृत हनुमान मंदिरासमोरील नाल्यात पडली. त्यानंतर ट्रक व रिक्षासमोर असलेल्या नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला(एम.एच.१९एम.९१४१)धडक देऊन त्याच नाल्यात पलटी झाला. ट्रकने धडक दिल्याने रुग्णवाहिकेची समोरच्या चारचाकीला (एम.एच.२0,सी.पी.७२९९) धडक बसली. या विचित्र अपघातात रिक्षातील दीपक अरुण पाटील (२४),रा.नशिराबाद, शहाजी माणिक जाधव (२२),रा.बुरसाळे,जि.सोलापूर, प्रमोद ज्ञानदेव गदरे (२२),रा.पुणे आणि दिनेश नीळकंठ जंगले(५0)रा.भुसावळ हे जखमी झाले. ते जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.
कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी
शहाजी जाधव व प्रमोद गदरे यांना ओम क्रिटीकल केअरमध्ये दाखल करण्यात आले. दोन्ही डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ अँग्रीकल्चरचे विद्यार्थी आहेत. दीपक अरुण पाटील याला 'सिव्हील'मधून खाजगी हॉस्पिटल व नंतर पुन्हा 'सिव्हील'मध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्याचा सायंकाळी ६ ला जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तो ली ग्रॅंड कंपनीत काम करीत होता.
शहाजीच्या छातीला व हातापायांना मार बसलेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे