एकीकडे रुग्णवाढ, दुसरीकडे डॉक्टर होताहेत कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:43+5:302021-08-20T04:20:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महत्त्वाचा असलेल्या स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागात एकीकडे प्रसूतीसाठी ...

एकीकडे रुग्णवाढ, दुसरीकडे डॉक्टर होताहेत कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महत्त्वाचा असलेल्या स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागात एकीकडे प्रसूतीसाठी महिलांची संख्या वाढत असताना डॉक्टरांची संख्या मात्र घटत आहे. सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण चव्हाण यांची प्रतिनियुक्तीवर नांदेड येथे बदली झाल्यामुळे या विभागात मनुष्यबळाचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
गेल्या दीड वर्षापासून जीएमसीमध्ये नॉन कोविड यंत्रणा बंद होती. अशा स्थितीत गरीब रुग्णांचे प्रचंड हाल झाले. या ठिकाणी केवळ कोविड बाधित किंवा संशयित महिलांच्याच प्रसूती होत होत्या. आता काही महिन्यांपूर्वी नॉन कोविड यंत्रणा सुरू झाल्यानंतर महिलांच्या कक्षांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यातच वैद्यकीय शिक्षणाचे नियमित वर्ग सुरू झाले आहेत. त्यातच आधीच कमी असलेल्या डॉक्टर प्राध्यापकांची संख्या पुन्हा कमी झाल्याने आहे त्यांच्यावर भार वाढणार आहे. याचाच परिणाम उपचार पद्धतीवरपण होणार आहे.
चार महिलांचे मृत्यू
या ठिकाणी गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये चार महिलांचे मृत्यू झाले आहेत. अशा स्थितीत या ठिकाणी रुग्णांच्या तुलनेत पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक होते. या ठिकाणी एक विभागप्रमुख यांच्यासह तीन प्राध्यापक कार्यरत आहेत. मात्र, त्यातच आता डॉ. चव्हाण यांची बदली झाल्याने आहे त्या मनुष्यबळावर प्रचंड ताण येत आहे. मनुष्यबळ कमी असताना ते भरले जात नसून आहे ते काढून घेतले जात असल्याने शासनाची नेमकी भूमिका काय आहे. ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.