गणेशोत्सवातील रोजगार उत्सवात दीडशे जणांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:32+5:302021-09-16T04:21:32+5:30
सचिन नारळेंची माहिती : सार्वजनिक गणेश मंडळांंतर्फे सकाळी नऊपासून विसर्जनाला होणार सुरुवात जळगाव : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असताना, ...

गणेशोत्सवातील रोजगार उत्सवात दीडशे जणांची नोंदणी
सचिन नारळेंची माहिती : सार्वजनिक गणेश मंडळांंतर्फे सकाळी नऊपासून विसर्जनाला होणार सुरुवात
जळगाव : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असताना, यंदाचा गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे रोजगार उत्सव म्हणून आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार या रोजगार उत्सवात कुशल व अकुशल अशा दीडशे जणांची नोंदणी झाली असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी दिली. तसेच १९ सप्टेंबर रोजी असणाऱ्या अनंत चतुदर्शीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाची सर्व तयारी झाली असून, सार्वजनिक गणेश मंडळांंतर्फे सकाळी नऊपासून विसर्जनाला सुरुवात होणार असल्याचेही सचिन नारळे यांनी सांगितले.
इन्फो :
तरुणांच्या मुलाखतींना सुरुवात
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार उत्सवात महामंडळाकडे दीडशे तरुणांनी आपले बायोडाटा पाठविले होते. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांचे व्हाॅट्सॲप नंबर सोशल मीडियावर जाहीर करण्यात आले होते. या नंबरवर शहरातील विविध शैक्षणिक वर्गवारीतील मुला-मुलींसह दीडशे तरुणाचे अर्ज आले होते. तसेच महामंडळाने रोजगार उत्सवाबाबत शहरातील विविध उद्योग, वित्तीय संस्था, व्यापारी यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या रिक्त जागांबाबत माहिती मागविली होती. त्यानुसार महामंडळाकडे ज्या बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्या युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित उद्योगांकडे पाठविण्यात येत असून, या तरुणांच्या मुलाखतींना सुरुवात झाली असल्याचे सचिन नारळे यांनी सांगितले.
रात्री दहापर्यंत सर्व गणेश मंडळांचे विसर्जन होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार यंदा कुठल्याही गणेश मंडळातर्फे मिरवणुका ना वाजंत्री काढण्यात येणार नाही. विसर्जनाच्या दिवशी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मंडळांतच निरोपाची आरती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर गेल्यावर्षी त्या-त्या गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग सांगितला आहे. त्याच मार्गावरून यंदाही श्री गणेश मूर्ती मेहरुण तलावाकडे आणण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले आहे. सकाळी नऊपासून विसर्जनाला सुरुवात होणार असून, रात्री दहापर्यंत सर्व गणेश मंडळांचे विसर्जन होणार असल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे सांगण्यात आले.