पुन्हा एकदा अपक्ष
By Admin | Updated: October 20, 2014 10:01 IST2014-10-20T10:01:27+5:302014-10-20T10:01:27+5:30
अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे.

पुन्हा एकदा अपक्ष
अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत, भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेना यासारख्या जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे. निवडणुकीत धनशक्तीचा जोर राहिला असला तरी, जनशक्तीही परिवर्तनासाठी एकवटली होती हेदेखील तेवढेच खरे आहे. तरुण व मराठेतर असलेल्या चौधरींनी दीड वर्षातच आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. सर्वप्रथम त्यांनी नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले. तेव्हाच विधानसभेचे निकालही अनपेक्षित लागू शकतील याची चुणूक मिळाली होती. पालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांनी शहरात काही प्रमाणात कामेही केली. त्याचा परिपाक म्हणून, मतदारांनी त्यांना भरघोस मतदान केले. शिवाय या निवडणुकीला अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असाही रंग दिला गेला होता. अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी निवडण्याची ही संधी असल्याची भावनिक साद घातली गेली, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला. राज्यात युती-आघाडीची जागा वाटपावरून बोलणीच सुरू राहिल्याने, या मतदारसंघातील भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे ठरत नसताना, चौधरींनी योग्य नियोजनाद्वारे इतर पक्षांच्या मानाने प्रचारातही आघाडी घेतली. त्याचा परिपाक विजयात झाला. आघाडी-युती फिसकटल्याने, चारही पक्ष स्वतंत्र लढले. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. या निवडणुकीत कॉँग्रेसचे अस्तित्वही दिसले नाही. कॉँग्रेसच्या उमेदवाराला चारअंकी संख्या मोठय़ा मुश्किलीने गाठता आली. यावरून अमळनेर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे अस्तित्व किती शिल्लक राहिले आहे, याची सहज कल्पना येऊ शकेल. शिवसेनेने ऐनवेळी निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले. मात्र ते त्यांना पेलवले नसले तरी, निवडणुकीत सेनेची कामगिरी ही कॉँग्रेसपेक्षा वरचढ ठरली, एवढी त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. खरी लढाई भाजप व राष्ट्रवादी यांच्यात होणार अशी अपेक्षा होती. मात्र चौधरींनी या दोन पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले होते. भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना नगरपालिकेच्या कारभाराचा मोठा फटका बसला. डॉ.बी.एस. पाटील यांच्या स्वगृही परतण्याने भाजपाला फायदा होईल ही अपेक्षाही फोल ठरली. राष्ट्रवादीचे सहयोगी असलेले साहेबराव पाटील यांनी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने, त्यांच्याबद्दलही एकप्रकारे नाराजीच होती. ही नाराजी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. एकला चलो रे ही भूमिका मतदारांना जास्त दिवस चालत नाही, हे या निकालातून दिसून आले. अन्य पक्षांच्या उमेदवारांची मतदारांनी फारशी दखलही घेतलेली नाही. त्यांची उमेदवारी नावालाच राहिली.