अरे देवा, पती देवांना तर पत्नीचाही मोबाईल क्रमांक आठवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:18+5:302021-07-11T04:12:18+5:30

डमी 895 रिॲलिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोबाईलमुळे सुविधा वाढल्या असल्या तरी काही प्रमाणात अनेक घटकांवरही परिणाम ...

Oh God, husbands don't even remember their wives' mobile numbers | अरे देवा, पती देवांना तर पत्नीचाही मोबाईल क्रमांक आठवेना

अरे देवा, पती देवांना तर पत्नीचाही मोबाईल क्रमांक आठवेना

डमी 895

रिॲलिटी चेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मोबाईलमुळे सुविधा वाढल्या असल्या तरी काही प्रमाणात अनेक घटकांवरही परिणाम झाला. यात घड्याळ, वॉकमन, टॉर्च यांच्या मागणीवर परिणाम झाला, त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांकदेखील लक्षात ठेवला जात नसल्याने मेंदूही आळशी होत असल्याचे समोर येत आहे. हा विसराळूपणा नाही तर आळसपणा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोबाईल क्रमांक पाठ असण्याविषयी काही जणांकडे विचारणा केली असता १० पैकी सात जणांना तर पत्नीचाही क्रमांक पाठ नसल्याचे आढळ‌ून आले. विशेष म्हणजे लहान मुले, महिला यांना मोबाईल क्रमांक पाठ होता.

गेल्या काही दिवसांत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून संपर्क साधण्याचे माध्यम असण्यासह करमणूक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. इतकेच मोबाईल सोबत राहत असल्याने कोणाचेही संपर्क क्रमांक त्यात आपण सेव्ह करीत असतो. त्यामुळे आता मोबाईल अथवा दूरध्वनी क्रमांक पाठ राहत नाही. कोणीही भेटले किंवा नवीन ओळख झाली की, त्यांचा नंबर नावाने मोबाइलमध्ये ठेवण्याची सवय झाली आहे. कोणाला फोन करायचा झाल्यास त्या-त्या नावाने नंबर शोधून थेट डायल करण्याची सवय लागली आहे.

यामुळे आता घरच्या मंडळींचेही संपर्क क्रमांक पाठ आहेत की नाही, या विषयी लोकमतने शहरातील काव्यरत्नावली चौकात काही जणांशी संवाद साधला. यामध्ये १० पैकी सात जणांना आपल्या पत्नीचेही क्रमांक पाठ नसल्याचे समोर आले.

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

एकूण दहा जणांपैकी सात जणांना पत्नीचा मोबाईल नंबर आठवला नाही. त्यात चार तरुण पतींचाही समावेश होता, तर दोन वृद्धांचा आणि एक मध्यम वयाच्या व्यक्ती होत्या. त्यांना पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नव्हता. एकूणच तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये क्रमांक सेव्ह करीत असल्याने ते लक्षात ठेवत नसल्याचे आढळून आले.

लोकमत @ काव्यरत्नावली चौक

एका जणाला पत्नीचा क्रमांक आठवत नव्हता मात्र कार्यालयाचा क्रमांक तोंडपाठ असल्याचे आढळून आले.

एका जणाने पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सुरुवातीचे काही क्रमांक सांगितले, मात्र पुढचे क्रमांक सांगितले नाहीत.

एका जणाने तर कार्यालयातील काही सहकाऱ्यांचे क्रमांक सांगितले, मात्र घरातील क्रमांक सांगता आले नाहीत.

एका शिक्षकाने मोबाईलचे कारण सांगत त्यात आपण मोबाईल क्रमांक सेव्ह करीत असतो, त्यामुळे पाठ ठेवत नसल्याचे सांगितले.

१० पैकी सात जणांना वेगवेगळे कारण सांगत मोबाईल क्रमांक पाठ नसल्याचे सांगितले.

बायकांना पती देवाचा नंबर पाठ

बाहेर कोठे जायचे झाल्यास बऱ्याचवेळी एकटे जावे लागते. त्यामुळे सोबत मोबाईल असो अथवा नसो, पीसीओवरून पतीशी संपर्क साधण्याचे काम पडले तर मोबाईल क्रमांक आठवावा, यासाठी अगोदरचपासूनच मोबाईल क्रमांक पाठ आहे. आता पीसीओ नसले तरी क्रमांक अजूनही पाठ आहे.

- एक गृहिणी

पती बाहेर गेलेले असले की घरी असलेल्या दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा क्रमांक लावताना तो पाठ होऊन गेला. त्यामुळे मोबाईल आला तरी क्रमांक अजूनही पाठ आहे.

- एक गृहिणी

मुलांना आई-बाबांचा क्रमांक पाठ

आई-वडिलांसह नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहेत. आई-वडिलांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर तत्काळ सांगू शकतो. मावशीसह इतरांचेही मोबाईल नंबर पाठ आहेत.

- हर्षल कुलकर्णी, विद्यार्थी

आई, बहिणीसह इतर नातेवाईकांचे नंबर लक्षात आहेत. शाळेत अथवा इतर ठिकाणाहून मोबाईल लावायचे काम पडल्यास क्रमांक पाठ असल्याने लगेच फोन लावता येतो.

- आशुतोष महाजन, विद्यार्थी

ज्या गोष्टी आ‌वश्यक आहेत, त्याच गोष्टी मनुष्य लक्षात ठेवत असतो. हा विसराळूपणा नाही तर आळसपणा आहे. मनुष्याचा मेंदू कितीही क्रमांक लक्षात ठेवू शकतो; मात्र तंत्रज्ञानाकडे जसे वळत आहे, तसा आळसपणा येत आहे. हा आळसपणा घालविण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. पंकज संघवी, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Oh God, husbands don't even remember their wives' mobile numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.