रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करणारे अधिकारीही कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:23+5:302021-07-23T04:12:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांच्या कामांची खराब गुणवत्ता व महिनाभरातच रस्त्यांची होणारी चाळणी पाहता अशा प्रकारच्या सुमार ...

Officers inspecting the quality of road works also got bored | रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करणारे अधिकारीही कंटाळले

रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करणारे अधिकारीही कंटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या कामांची खराब गुणवत्ता व महिनाभरातच रस्त्यांची होणारी चाळणी पाहता अशा प्रकारच्या सुमार दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना चाप बसावा म्हणून महापौर जयश्री महाजन यांनी मनपातील दोन अधिकारी विलास सोनवणी व नरेंद्र जावळे या अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. तसेच शहरातील रस्ते व इतर कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी या दोन्ही अधिकाऱ्यांवर देण्यात आली. मात्र, अभियंत्यांकडून मिळत नसलेले सहकार्य व नगरसेवकांच्या वाढत्या दबावामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व्यवस्थित द्यायच्या नाहीत. तसेच रस्ते, नाल्याची भिंत उभारणे अशा कामांमध्ये स्वत:चा आर्थिक लाभ होण्यासाठी ठेकेदारांकडून कामात कुचराई केली जात आहे. दुसरीकडे अशा कामांना चाप बसावा म्हणून कामांचा दर्जा तपासण्यासाठी स्थापन समितीच्या सदस्यांनी एखाद्या कामात त्रुटी काढल्यास त्या अधिकाऱ्यांवर नगरसेवकांमार्फत दबाव टाकण्याचे काम सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच मनपातील अभियंतेदेखील या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याने दोनच महिन्यात समिती सदस्यांनी कंटाळून समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. तसेच हे काम दुसऱ्या अधिकाऱ्यांना सोपवा, असेही सांगितले आहे.

आयुक्तांनी अभियंत्यांना भरला दम

समितीमध्ये समावेश असलेले विलास सोनवणे व नरेंद्र जावळे हे दोन्हीही अधिकारी शिस्तबध्द व कडक आहेत. मात्र, त्यांना मिळणाऱ्या असहकार्यामुळे दोन्हीही अधिकाऱ्यांनी महापौर जयश्री महाजन व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे राजीनामा सोपविला होता. आयुक्तांनी अद्याप हा राजीनामा स्वीकारलेला नाही. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या नाराजीनंतर आयुक्तांनी मनपाच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेवून, समिती सदस्यांनी सहकार्य करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच कामात कुचराई करणाऱ्या व अधिकाऱ्यांना असहकार्य करणाऱ्या अभियंत्यांवर कडक कारवाईचा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे.

Web Title: Officers inspecting the quality of road works also got bored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.