लसीकरणास पुरवठ्याचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:42+5:302021-07-28T04:17:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : शहरासह तालुक्यात लसींचा पुरेसा साठा मिळत नसल्याने कोरोना लसीकरण अपेक्षित प्रमाणात होताना दिसून ...

Obstacles to supply for vaccination | लसीकरणास पुरवठ्याचा अडसर

लसीकरणास पुरवठ्याचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : शहरासह तालुक्यात लसींचा पुरेसा साठा मिळत नसल्याने कोरोना लसीकरण अपेक्षित प्रमाणात होताना दिसून येत नाही. तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्याचे शासनाकडून वेळोवेळी सांगितले जात आहे. असे असले तरी लस मिळविण्यासाठी नागरिकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

लसींच्या अपुऱ्या पुरवठ्याने आजपर्यंत पहिला डोस २० व दुसरा डोस फक्त पाच टक्के नागरिकांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी चिंतित करणारी आहे. वेळोवेळी केवळ निर्बंधांची सक्ती करणाऱ्या प्रशासनाने लसीच्या पुरवठ्याबाबतही सतर्क राहिले पाहिजे, असे बोलले जात आहे.

तालुक्यात जामनेर उपजिल्हा रुग्णालय, पहूर ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातसुद्धा ग्रामपंचायतीच्या मदतीने उपकेंद्र स्तरावर लसीकरण करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण हे ऑनलाइन पद्धतीने असल्याने ज्या गावात रेंज, कॉम्प्युटर किंवा सुरळीत वीजपुरवठा या सुविधा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी आरोग्य विभागाला लसीकरण करता येत नाही. ग्रामीण भागात कोठे व केव्हा लसीकरण होणार आहे हे ग्रामपंचायतीच्या व आरोग्य विभागाकडून नियमितपणे नागरिकांना कळविण्यात येते. खेड्यांमध्ये दवंडीसुद्धा दिली जाते. परिणामी लसीच्या उपलब्धतेनुसार नागरिक केंद्रावर पोहोचतात.

जामनेर शहरात कोरोना लसीकरण आहे किंवा नाही याची माहिती बऱ्याच वेळेस नागरिकांना मिळत नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृती करून वॉर्डनिहाय लसीकरण पूर्ण केल्यास अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकते.

आजपावेतो झालेले लसीकरण-

पहिला डोस ४३०६९, अंदाजे २० टक्के

दुसरा डोस ११२७४, अंदाजे ५ टक्के

जिल्हास्तरावर लससाठा उपलब्ध झाल्यावर तालुक्याला केंद्रनिहाय वितरित करण्यात येतो. साठा उपलब्ध असल्यास त्याच दिवशी सुट्टी असली तरी सर्व लसींचा वापर आरोग्य विभागाकडून करण्यात येतो.

- डॉ. राजेश सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, जामनेर

Web Title: Obstacles to supply for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.