संख्यात्मक स्क्रीप्ट वाढल्या, मात्र गुणात्मकतेचा -हास, जळगावात सेन्सॉर बोर्ड सदस्यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:42 IST2018-01-24T17:41:44+5:302018-01-24T17:42:22+5:30
लेखनाच्या दर्जावर बोर्ड समाधानी नसल्याचा पत्रपरिषदेत उमटला सूर

संख्यात्मक स्क्रीप्ट वाढल्या, मात्र गुणात्मकतेचा -हास, जळगावात सेन्सॉर बोर्ड सदस्यांची खंत
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- आज मोठय़ा प्रमाणात नाटय़ लेखन होत आहे व त्याच प्रमाणात त्याचे सादरीकरणही होत आहे. यात संख्यात्मक स्क्रीप्ट वाढल्या असल्या तरी गुणात्मक स्क्रीप्ट त्या प्रमाणात येत नसल्याचा सूर रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळातील (सेन्सार बोर्ड) सदस्यांसोबतच्या पत्रपरिषदेतून उमटला. इतकेच नव्हे लेखनाच्या दर्जावर बोर्ड समाधानी नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले. तर दुसरीकडे आजच्या स्क्रीप्टचे आजच मूल्यमापन करणे योग्य नाही, असेही काही जणांनी सांगितले.
रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळातील (सेन्सार बोर्ड) सदस्यांचा स्थानिक कलावंतांशी संवाद झाल्यानंतर पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हा सूर उमटला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
प्रसिद्धीचा उद्देश ठेवूनच वादाचे मुद्दे
सध्या पद्मावत चित्रपटासंदर्भात जो वाद सुरू आहे, त्याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंडळाचे सदस्यांनी स्पष्ट केले की, नाटकाची स्क्रीप्ट अगोदर पाहिली जाते, मात्र चित्रपटाचे तसे नसते. त्यामुळे वाद उद्भवतात. कदाचित चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा उद्देश ठेवूनच अनेक दिग्दर्शकांकडून असे वादाचे प्रसंगांचा समावेश केला जातो, असे सदस्यांनी सांगितले.
लहान मुलांचा विचार करून बालनाटय़ाची निर्मिती व्हावी
बालनाटय़ामध्ये शिवीचा वापर होण्याबाबत विचारले असता सदस्य म्हणाले की, लहान मुले कोणते नाटक पाहतात, हे महत्त्वाचे आहे. त्यांचा विचार डोळ्य़ासमोर ठेवून नाटकाची स्क्रीप्ट असावी. यात वादग्रस्त प्रसंग मंडलाने कापले व सादरीकरणात ते आले तर त्याला मंडळ काही करू शकत नाही, मात्र यात प्रेक्षकही नाटकांचा अविभाज्य घटक असल्याने तो यावर आक्षेप घेऊ शकतो, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
तरुणांच्या प्रश्नांवर नाटकांची निर्मिती व्हावी
सध्या कोणत्या नाटकांची निर्मिती व्हावी यावर बोलताना सांगण्यात आले की, सध्या तरुणांच्या प्रश्नांवर नाटकांची निर्मिती तर व्हावीच व ते व्यावसायिकरित्या घराघरात पोहचले पाहिजे. सध्या सोशल मीडियाचा धुमाकूळ वाढला असून यावर भाष्य होणे आवश्यक असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
गुणात्मक दर्जा वाढावा
25 ते 30 वर्षापूर्वीचे व आजच्या नाटय़ांची तुलना सांगताना आज संख्या वाढली असली तरी कानिटकर, शिरवाडकर यांच्या नाटकाचा दर्जा आज येत नाही. एकूणच गुणात्मक दर्जा वाढणे आवश्यक असल्याचा सूर या वेळी उमटला.
विनोदी मालिकांवर नियंत्रण गरजेचे
सध्या दूरचित्रवाणीवर सादर होणा:या विनोदी मालिकांमधून मोठय़ा प्रमाणात बिभस्त संवाद वाढत असल्याबद्दल विचारले असता, हा प्रश्न गंभीर होत असून यावर नियंत्रण येणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष अरुण नलावडे यांच्यासह सदस्यांनी सांगितले. यासाठीदेखील सेन्सॉर असावे तसेच सरकारनेदेखील यावर लक्ष देऊन नियंत्रण आणावे, अशी मागणीच या वेळी सदस्यांनी मांडली.