वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देणार नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:20+5:302021-08-20T04:22:20+5:30
जळगाव : यावल तालुक्यातील आसराबारी पाड्यावरील एका आठ महिन्याच्या कुपोषित बालकाचा मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला ...

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देणार नोटीस
जळगाव : यावल तालुक्यातील आसराबारी पाड्यावरील एका आठ महिन्याच्या कुपोषित बालकाचा मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची स्वतंत्र चौकशी केली असून यावरून आता तालुक्यातील आरोग्य विभाग तसेच महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून या घटनेबाबतचा खुलासा घेतला जाणार आहे.
शुक्रवारी या नोटीसा देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांनी दिली.
बालकाच्या मृत्यूनंतर पुन्हा सर्वेक्षणाचे आकडे समोर आले असून यात तीन पटीने कुपोषीत बालकांची संख्या वाढली आहे. या प्रकरणानंतर शासकीय यंत्रणा या पाड्यावर पोहोचली. विविध माध्यमातून याची चौकशी करण्यात आली. या ठिकाणी कुठल्याच उपाययोजना पोहोचल्या नसल्याचे समोर आले होते. या सर्व प्रकारची जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्य समितीने चौकशी करून अहवाल सीईओ डॉ. पंकज आशिया यांच्याकडे देण्यात आला आहे.
त्यानुसार तालुक्याचे आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, संबधीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून खुलासे मागविण्यात येणार आहेत.