विज्ञान विषयासाठी विषय शिक्षकच नाही;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:52+5:302021-07-29T04:16:52+5:30

स्टार - ९७६ सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषद शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयांसाठी विषय ...

Not just a subject teacher for a science subject; | विज्ञान विषयासाठी विषय शिक्षकच नाही;

विज्ञान विषयासाठी विषय शिक्षकच नाही;

स्टार - ९७६

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयांसाठी विषय शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि जिल्हा परिषदेच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक प्रक्रियेचे वर्ग गणित व विज्ञान विषय शिक्षकांअभावी बंद पडत चालले आहेत. त्यामुळे पात्र शिक्षकांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा आहेत़ त्यापैकी इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्ग अध्यापनासाठी स्वतंत्र विषयावर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली जाते. आरटीई अ‍ॅक्ट २००९ नुसार उच्च प्राथमिक वर्गांना (सहावी ते आठवी) गणित, विज्ञान, भाषा व समाजशास्त्र, असे विषयनिहाय शिक्षक असावेत, असे धोरण आहे. जळगाव व जिल्ह्यातील शाळांमध्ये भाषा विषय पदवीधर व समाजशास्त्र विषय पदवीधर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, तर समाजशास्त्र विषयाची बरीच पदे अतिरिक्त झालेली आहेत. त्यांना गणित, विज्ञान विषय शिक्षकांच्या जागी नियुक्ती दिलेली आहे़; मात्र महत्त्वाच्या व मुख्य विषय समजल्या जाणाऱ्या गणित व विज्ञान विषयांसाठी विषय शिक्षक नाहीत.

सलग दोन वर्षे मागविली होती माहिती

जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वी संबंधित विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी व त्याअनुषंगाने माहिती संकलन करण्यासाठी २१ डिसेंबर २०१९ व २ मार्च २०२० रोजी पत्रे जारी केली होती़ त्यानुसार सर्व माहिती शिक्षण विभागाकडे प्राप्त असूनही अद्यापर्यंत बीएस्सी पदवी प्राप्त केलेले बरेच पात्र शिक्षक असूनही संबंधितांना गणित, विज्ञान विषय शिक्षकपदी नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

अडीचशे जागा रिक्त?

केवळ विज्ञान विषयांची अडीचशे जागा रिक्त असल्याची माहिती एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली, तर भाषा व समाजशास्त्र विषयांसाठी विषय शिक्षण पूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

६६ शिक्षकांचे समायोजन

दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी ६६ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्राथमिक विभागांतर्गत अल्पसंख्याक शाळांमधील १२ तर बिगर अल्पसंख्याक शाळांमधील १४ असे एकूण २६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समायोजन करण्यात आले आहे, तर माध्यमिक विभागांतर्गत ४० शिक्षक अतिरिक्त ठरले होते, त्यांचेही समायोजन करण्यात आले आहे.

Web Title: Not just a subject teacher for a science subject;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.