पदक मिळविण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी धावा - क्रांती साळवी
By Admin | Updated: July 10, 2017 00:49 IST2017-07-10T00:49:33+5:302017-07-10T00:49:33+5:30
नियमित धावण्याच्या सरावामुळे उत्साह वाढत असतो. त्यामुळे आपल्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित धावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांनी केले.

पदक मिळविण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी धावा - क्रांती साळवी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्पर्धेत सहभागी होवून व त्या स्पर्धेत विजय प्राप्त करून केवळ पदक मिळविण्यासाठी धावू नका. कारण धावणे म्हणजे केवळ एक नियमितचा सराव नसून ती एक जीवनप्रणाली आहे. नियमित धावण्याच्या सरावामुळे उत्साह वाढत असतो. त्यामुळे आपल्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित धावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांनी केले.
जळगावरनर्स गृप व रोटरी क्लब आॅफ वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे क्रांती साळवी यांच्या ‘दौडो जिंदगी के लीए’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
धावण्यामुळे मिळाला सन्मान
क्रांती साळवी म्हणाल्या की, धावण्याचा नियमित सराव करत असताना वेळेचे फार महत्व असते. तसेच स्वत:ची काळजी घेणे देखील फार महत्वाचे असते. घरगुती कामाकडे लक्ष देवून व धावण्याची जीवनप्रणाली स्विकारल्यामुळे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाले. यामुळे आज जो काही सन्मान मिळाला तो केवळ धावण्यामुळे मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अनुभव कथन करताना झाल्या भावूक
विविध स्पर्धांमध्ये घेतलेल्या सहभागाचे काही छायाचित्र उपस्थिताना दाखविले. तसेच अशा क्षेत्रात जेव्हा एखादी महिला सहभागी होत असते. तेव्हा महिलांना कुटुंबियांचे समर्थन फार महत्वाचे असते. ते समर्थन मला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. अनुभव कथन करीत असताना त्या भावूक झाल्या होत्या.
एक-दोन स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर अपेक्षा वाढत गेल्या त्यामुळे ‘बोस्टन’ मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला असेही त्या म्हणाल्या. तसेच जळगावात रनर्स गृपकडून देखील चांगले काम सुरु असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले. तसेच भविष्यात जळगावमध्ये देखील मोठ्या मॅरेथॉनच्या स्पर्धा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.