मोकाट जनावरांबाबत न. पा. प्रशासन सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:19+5:302021-09-14T04:19:19+5:30
एक ते दोन दिवस काही मोकाट जनावरांना पालिका प्रशासनाने पकडले. मात्र, पालिकेकडे कोंडवाडाच नसल्याने शेकडो जनावरे ठेवायची कुठे म्हणून ...

मोकाट जनावरांबाबत न. पा. प्रशासन सुस्त
एक ते दोन दिवस काही मोकाट जनावरांना पालिका प्रशासनाने पकडले. मात्र, पालिकेकडे कोंडवाडाच नसल्याने शेकडो जनावरे ठेवायची कुठे म्हणून नाममात्र कारवाई करून हा विषय दुर्लक्षित केला. अर्थात मोकाट जनावरांच्या एकही पालकांपर्यंत पालिकेचा आवाज पोहोचला नसल्याने मोकाट जनावरांची चौकाचौकांत शाळा भरायला लागली आहे. त्यामुळे रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अडथळा ठरत आहे. एरव्ही या मोकाट जनावरांमुळे अचानक रस्त्यात पुढे आल्याने दुचाकीला अपघातही होत आहेत.
शहरात शेकडो जनावरांना त्यांचे पालक सकाळी मोकळे सोडून देतात. ही सर्व जनावरे शहरातील वसाहतींमध्ये आणि गावात भटकत असतात आणि काहीवेळाने मोठ्या चौकात रवंथ करीत चौकात जाऊन बसतात. त्यामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहन चालकांना जिकिरीने वाहने चालवावे लागतात. अशातच काही ठिकाणी हे मोकाट जनावरे वाहनांमध्ये येतात आणि दुचाकीधारकांचे अपघात होतात. त्यात चालकासह सोबत असलेले प्रवासी जखमी होतात किंवा मुका मार त्यांना लागत असतो.
पालिकेने कठोर कारवाई करावी
दरम्यान, शहरातील या शेकडो मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी या जनावरांच्या पालकांना दंडात्मक व कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
मोकाट जनावरे पकडून गो शाळेत रवानगी करणार : पोलीस निरीक्षक
दरम्यान, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पालिकेला याबाबत अनेकवेळा सांगितले गेले आहे. आता ही सर्व मोकाट जनावरे ताब्यात घेऊन त्यांची कायमस्वरूपी गो शाळेत रवानगी केली जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.