महिला सुरक्षेसाठी पोलीस विभागाच्या ‘प्रतिसाद ॲप’कडून ‘प्रतिसाद’च मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:46+5:302021-09-17T04:20:46+5:30
मतीन शेख लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरण घडल्यानंतर दक्ष होत महाराष्ट्र पोलिसांनी महिलांच्या संरक्षणासाठी ...

महिला सुरक्षेसाठी पोलीस विभागाच्या ‘प्रतिसाद ॲप’कडून ‘प्रतिसाद’च मिळेना
मतीन शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरण घडल्यानंतर दक्ष होत महाराष्ट्र पोलिसांनी महिलांच्या संरक्षणासाठी सुरू केलेला ‘प्रतिसाद ॲप’ बंद पडला आहे. डाऊनलोड केल्यानंतर ॲक्टिव्ह करण्यासाठी हा ॲप ‘प्रतिसाद’च देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संकट काळात महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या ‘प्रतिसाद ॲप’कडून प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे.
दिल्ली येथे घडलेल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या काळात देशभरात नागरिक संतप्त झाले होते. केंद्रासह देशभरातील राज्य सरकारांनी महिला संरक्षणासाठी विविध उपाययोजना अंगीकारल्या होत्या. महिला नोकरवर्ग, खासगी कंपनीतील महिला कर्मचारी व कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या युवती आणि महिलांना संकट काळात पोलिसांची तत्काळ मदत मिळविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून ‘प्रतिसाद ॲप’ विकसित केले आहे.
कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या टेक्नोसॅव्ही युवती आणि महिलांना एका क्लिकवर पोलिसांची मदत मिळण्याची संकल्पना असलेला हे ॲप सध्या वापरात येत नाही.
साकीनाका येथील दुर्दैवी घटनेनंतर या ॲपची आठवण पुन्हा लक्षात आली. अनेक युवतींनी ॲप डाऊनलोड केले; परंतु हे ॲप रजिस्टर विंडोच्या पुढे सरकत नसल्याने ॲप प्रतिसादाअभावी निकामी ठरत आहे.
गेल्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून महिला सुरक्षेसाठी गाजावाजा करून लाँच झालेले हे ॲप सध्यातरी निकामी वाटत आहे. ॲप प्रतिसादच देत नाही म्हणून या ॲपच्या माध्यमातून नेमकी कशी मदत होणार याबाबत अनभिज्ञता असल्याचा सूर महिलांमधून उमटत आहे.
मीसुद्धा ‘प्रतिसाद ॲप’ डाऊनलोड करून पाहिला. काही तांत्रिक अडचण असेल या कारणास्तव ‘प्रतिसाद ॲप’ लवकर डाऊनलोड होत नाही. किंबहुना रजिस्टर होत नाही.
-परवीन तडवी, महिला पोलीस उपनिरीक्षक, मुक्ताईनगर
ॲप अनेक वेळा डाऊनलोड केले; परंतु रजिस्ट्रेशन होत नाही आणि रजिस्ट्रेशन विंडोच्या पुढे ॲप जात नाही. परिणामी, प्रतिसाद ॲप महिलांना संकट काळात कशी मदत करेल याबाबत साशंकता आहे.
-डॉ. उज्ज्वला योगेश पाटील, मुक्ताईनगर