मला शहराचा विकास करण्यापासून कुणी रोखू शकत नाही - गिरीश महाजन
By Admin | Updated: October 24, 2015 00:41 IST2015-10-24T00:41:09+5:302015-10-24T00:41:09+5:30
जळगावचा विकास करण्यापासून आपणास कुणी रोखू शकत नाही, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मला शहराचा विकास करण्यापासून कुणी रोखू शकत नाही - गिरीश महाजन
जळगाव : राजकारण व निधीचा अभाव यामुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. रस्त्यावरील साधे खड्डे बुजविण्यासाठी नगरसेवकांना पुरेसा निधी नाही. परिणामी पाच लाख जळगावकर त्रस्त आहेत. मी नाशिकचा पालकमंत्री असलो तरी राज्याचा जलसंपदामंत्री आहे. त्यामुळे जळगाव शहर किंवा कुठल्या गावाचा विकास करण्यास बंधन नाही व जळगावचा विकास करण्यापासून आपणास कुणी रोखू शकत नाही, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी रावण दहनप्रसंगी दिली. एल.के. फाउंडेशनतर्फे मेहरूण चौपाटीवर हा कार्यक्रम झाला. जलसंपदामंत्र्यांनी या वेळी जाहीर भाषण केले नाही किंवा व्यासपीठावरून जाहीरपणे आपली भूमिका मांडली नाही. पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता त्यांना विविध मुद्दय़ांवर आपले स्पष्टीकरण दिले. या वेळी तलावाच्या मध्यभागी असलेल्या ओटय़ावर रावणाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. तिचे जलसंपदामंत्र्यांच्या हस्ते दहन झाले. गर्दी पाहून जलसंपदामंत्रीही झाले थक्क रावण दहन कार्यक्रमप्रसंगी झालेली नागरिकांची गर्दी पाहून जलसंपदामंत्री अवाक झाले. आमच्या जामनेरातही रावण दहनाचा कार्यक्रम होतो, पण तेथे एवढी गर्दी जमत नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमस्थळी मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले होते, त्यावर सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. पालकमंत्री नसलो तरी मंत्री आहे.. पत्रकारांशी वार्तालाप करताना गिरीश महाजन यांनी अनेक मुद्दय़ांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आपण नाशिकचे पालकमंत्री आहात, मग जळगाव शहराचा विकास कसा करणार? असे विचारले असता ते म्हणाले, मी नाशिकचा पालकमंत्री आहे. पण राज्याचा मंत्री आहे. मंत्र्यांना कुठलेही गाव, शहराचा विकास करता येईल. विकासासाठी बंधन नाही. त्यानुसार जळगाव शहराचा विकासही करू. येथे सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. विकासासाठी ते एकत्र आल्याने त्यासाठी आपणही जबाबदारी घेऊन काम करायला हवे. पाच लाख नागरिकांसाठीपुढे यावे लागेल.. पाच लाख नागरिक शहरात आहेत. राजकारणामुळे शहराचा विकास पाच-सहा वर्षापासून रखडला आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न आहे. विकास ठप्प असल्याने नाराजी आहे. त्या पाच लाख नागरिकांसाठी आपल्याला पुढे यावे लागेल, मागील गोष्टी विसराव्या लागतील, असेही जलसंपदामंत्र्यांनी स्पष्ट केले. ललित कोल्हेंची स्तुती, विकासासाठी पाठिंबा महाजन यांनी ललित कोल्हे यांच्या विकास कामांबाबतच्या भूमिकेची स्तुती केली. कोल्हे हे सामाजिक बांधिलकी जोपासून कामे करीत आहे. त्यांच्या विकासाचे मुद्दे, मागण्या यास नेहमीच आपला पाठिंबा राहील, असेही ते म्हणाले.