पक्षापेक्षा कोणीच मोठा नसतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:00+5:302021-09-14T04:21:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या कार्यमुक्तीच्या मागणीनंतर १२ सेलच्या अध्यक्षांनी राजीनामे देणार ...

पक्षापेक्षा कोणीच मोठा नसतो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या कार्यमुक्तीच्या मागणीनंतर १२ सेलच्या अध्यक्षांनी राजीनामे देणार असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केल्याने यावर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे. पक्षापेक्षा कोणीच मोठा नसतो व पक्ष कुणासाठी थांबत नाही, अशा शब्दात या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. भुसावळ येथील एका कार्यक्रमात ऑनलाइन संवाद साधत त्यांनी हा मुद्दा मांडला.
जळगावात ज्येष्ठ नेत्यांवर ठपका ठेवत तरुणांना काम करू दिले जात नसल्याचे सांगत १२ सेलच्या अध्यक्षांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय जाहीर केला होता. अभिषेक पाटील यांनी याआधी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून कार्यमुक्त करावे, ज्येष्ठ वारंवार तक्रारी करीत असल्याने काम करता येत नसल्याचे त्यांनी यात नमूद केले होते. यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावर चर्चा सुरू झाल्या होत्या. याची दखल घेत राजीनामा देणे व पक्षास वेठीस धरणे हे योग्य नाही. सध्या जळगावात पेपरबाजी केली जात असून यातून काही साध्य होणार नाही. पक्ष कोणासाठी थांबत नाही किंवा पक्षापेक्षा कोणीच मोठे नाही. हे लक्षात ठेवून पक्षाच्या सूचना आदेशांचे पालन करावे, आपल्याला मिळालेली जबाबदारी कधीतरी सोडायची आहे हे लक्षात असू द्यावे, असे अजित पवार म्हणाले. भुसावळ येथे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन ऑनलाइन करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते.