ना वाजल्या घंटा...ना झाला किलबिलाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:42+5:302021-06-16T04:22:42+5:30
चाळीसगाव : गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाला औपचारिकपणे सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांविना मंगळवारी शाळा उघडण्यात आल्या. त्यामुळे ना शाळांच्या ...

ना वाजल्या घंटा...ना झाला किलबिलाट !
चाळीसगाव : गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाला औपचारिकपणे सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांविना मंगळवारी शाळा उघडण्यात आल्या. त्यामुळे ना शाळांच्या घंटा वाजल्या, ना मुलांचा किलबिलाट झाला. काही शाळांनी मात्र पटनोंदणीत दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पुस्तके व फुले देऊन स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावी वगळता इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची उपस्थिती ५० टक्केच असावी, असे निर्देश सोमवारी उशिरा शिक्षक संचालक द. गो. जगताप यांनी जारी केले आहेत.
कोरोना संक्रमणाचा धोका अजूनही टळलेला नसल्याने शाळा अनलॉक करण्यात आलेल्या नाहीत. १५ जून रोजी नवे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले;मात्र विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गेल्या मार्च महिन्यापासून शाळांची झालेली टाळेबंदी १५ महिन्यांनंतरही कायम आहे. यामुळे यावर्षीच्या शैक्षणिक वर्षावरही अनिश्चिततेचे सावट कायम असून नियमितपणे शाळा भरणार तरी कधी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पहिल्या दिवशी शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती
सोमवारपासून पटनोंदणी सप्ताहाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार शिक्षकांनी सहा वर्ष वय पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे सुरु केले आहे. मंगळवारी १५ रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने शिक्षक १०० टक्के उपस्थित होते. काही सकाळ तर काही शाळा दुपारच्या सत्रातही उघडल्या गेल्या. ३३५ जि. प. व खासगी प्राथमिक शाळा तर ७५० माध्य. शाळाही विद्यार्थ्यांशिवाय उघडण्यात आल्या.
शिंदी येथील शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
शिंदी येथील जि. प.च्या उच्च प्राथमिक शाळेत मंगळवारी इयत्ता पहिलीत दाखल केलेल्या विद्यार्थ्यांचा पुस्तके व फुले देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण, सहशिक्षक हिरालाल नागमोती, राजेंद्र वाघ, मुन्ना देशमुख, प्रदीप पाटील, प्रल्हाद चिंचोले, सविता वाघ, भारती बोरसे, गोरख वाघ, गणेश येवले, रावसाहेब राठोड आदी उपस्थित होते.
शिक्षकांची उपस्थिती ५० टक्केच
नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्केच असणार आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये. यासाठीच हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून शिक्षकांच्या उपस्थितीचे नियोजन मुख्याध्यापकांनी केले आहे. दरदिवशी ५० टक्केच शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहतील.
१...इयत्ता दहावी व बारावीच्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के करण्यात आली.
२..शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थितीदेखील १०० टक्के असणार आहे.
३...सोमवारी रात्री उशिरा शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी एका पत्राव्दारे हे निर्देश जारी केले आहेत.
===Photopath===
150621\15jal_7_15062021_12.jpg
===Caption===
शिंदी येथील जि.प.शाळेत मंगळवारी शाळेच्या पहिल्या दिवशी पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मुख्याध्यापक व शिक्षक वृंद. (छाया : जिजाबराव वाघ)