वार्तापत्र- संयमित पावसामुळे पिकांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:51+5:302021-09-03T04:16:51+5:30

अमळनेर : येथे गेल्या चार दिवसांपासून संयमित स्वरूपाचा भिज पाऊस सुरू आहे. अन्यत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे मोठे नुकसान झाले ...

Newsletter- Moderate rains raise farmers' hopes with crops | वार्तापत्र- संयमित पावसामुळे पिकांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

वार्तापत्र- संयमित पावसामुळे पिकांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

अमळनेर : येथे गेल्या चार दिवसांपासून संयमित स्वरूपाचा भिज पाऊस सुरू आहे. अन्यत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे मोठे नुकसान झाले आहे. येथे मात्र समाधानकारक पावसामुळे पिकांसह शेतकरीही पल्लवित झाले आहेत. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. विहिरी तुडुंब भरू लागल्या आहेत. परिणामी पेयजलाची समस्या सुटली आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न जवळपास निकाली निघाल्यात जमा आहे. वातावरणातील दीर्घकालीन असह्य उष्मा कमी होऊन गारवा वाढला आहे.

दरम्यान, खरीप अनेकांच्या हातून गेलेला असला तरी या पावसामुळे काहींचा खरीपही बऱ्यापैकी तरला आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नदी, नाले, ओढे यांना पूर आल्याने व जमिनीत चांगले पाणी जिरल्याने विहीर, बोअरवेल यांच्या पातळीतही वाढ होणार आहे.

जून, जुलै व ऑगस्ट असे पावसाळ्याचे तीन महिने कोरडे होते. त्यामुळे अनेकांनी दुबार व तिबार पेरणी करूनही त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे रब्बीच्याही आशा धूसर होत होत्या. शेतकऱ्यांना जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न मुख्यत्वे भेडसावत होता. काही पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीस काढले होते, तर काहींनी परजिल्ह्यात चराईसाठी पाठविले होते. मात्र गत तीन-चार दिवसांपासून शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. शेतीनिर्भर घटकांमध्ये समाधान दिसून येत आहे. पाऊस झाल्यामुळे बैलपोळा सणही शेतकरी बांधवांकडून उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. परिणामी पोळ्यासाठी तथा बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रेत्यांसह एकूणच बाजारपेठेत चहलपहल वाढली आहे.

Web Title: Newsletter- Moderate rains raise farmers' hopes with crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.