वार्तापत्र क्राईम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:41+5:302020-12-04T04:42:41+5:30
सुनील पाटील गुन्हे दाखल झाले, ठेवीदारांना न्याय मिळेल का? भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, ...

वार्तापत्र क्राईम
सुनील पाटील
गुन्हे दाखल झाले, ठेवीदारांना न्याय मिळेल का?
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, अपहार झाल्याप्रकरणी पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलिसांचे १३५ जणांचे पथक जळगावात पोहचले. या प्रकरणातील बडा मासा जितेंद्र कंडारे व सुनील झंवर या दोघांसह इतरांच्या घरी तसेच कार्यालयांवर छापे घातले. पाच जणांना अटक झाली. ट्रकभरुन पुरावे पोलिसांनी गोळा केले गेले. आणखी तपास सुरु आहे, पुढे काय निष्पन्न होते तो तपासाचा भाग आहे. मात्र, प्रश्न निर्माण होतो, ज्या ठेवीदारांची रक्कम अजूनही अडकली आहे त्यांना ही रक्कम मिळेल का?, त्याशिवाय २५ ते ३० टक्के रक्कम देऊन शंभर टक्के रक्कम मिळाल्याचे शपथपत्र लिहून देणाऱ्या ठेवीदारांनाही त्यांची उर्वरित रक्कम मिळेल का?. ज्यांनी कष्ट करुन पैसा गुंतवला, त्यांना खरे तर व्याजासह रक्कम मिळणे अपेक्षित होती, ती तर सोडाच उलट ३० टक्के रक्कम देऊन शंभर टक्के मिळाल्याचे शपथपत्र घेऊन ठेवीदारांना हाकलून लावले. ज्यांनी हे पाप केले, त्याचे फळ त्यांना मिळेल, काहींना मिळतेय..पण या ठेवीच्या भरवशावर अनेक ठेवीदारांनी मुलांचे लग्न, शिक्षण, नोकरी,घर, जागा विकत घेणे यासह अनेक स्वप्न पाहिली होती, मात्र या चोरांमुळे गरीबांच्या स्वप्नांचा चुराडा व अपेक्षा भंग झाला. आधीच संस्थापक, संचालकांनी ठेवीदारांना धुतले, त्यानंतर ज्यांच्यावर विश्वास ठेवून शासनाने अवसायक म्हणून नेमले त्याने धुण्यावर धुणे धुतले. सेवानिवृत्तीनंतरही कंडारेला तेथेच मुदतवाढ देण्यात आली. अर्थात या साऱ्या कामात राजकीय व काही सरकारी बाबुंचे सहकार्य असणारच, त्यात शंका नाही. त्याशिवाय हे शक्यच नाही. आता देखील राजकीय वादातूनच प्रकरण बाहेर आल्याचे बोलले जात आहे. कारण गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी १३५ जणांचे पथक जळगावात धडकते. इतकी तत्परता कधीच कोणत्या गुन्ह्यात दिसली नाही. याचाच अर्थ गुन्हा दाखल करण्यापासून तर पथक तयार करणे, त्यांना वाहने उपलब्ध करुन देणे, पथकात कोणाला घेणे हे सर्व नियोजितच होते. या प्रकरणात रस असणारे राजकीय नेते असो की तपास यंत्रणा यांनी अशीच तत्परता ठेवीदारांच्या ठेवी काढण्यासाठी दाखवावी, म्हणजे गरीबांसाठी खरोखर कोणाची किती तळमळ आहे हेही लक्षात येईल.