नवदाम्पत्याला झाडाला बांधून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:47+5:302021-06-21T04:12:47+5:30
बोदवड जि. जळगाव : डोक्याला पिस्तूल लावून नवदाम्पत्याला झाडाला बांधले आणि मारहाण करुन त्यांच्याकडील ३२ हजाराचा ऐवज लुटण्यात आला. ...

नवदाम्पत्याला झाडाला बांधून मारहाण
बोदवड जि. जळगाव : डोक्याला पिस्तूल लावून नवदाम्पत्याला झाडाला बांधले आणि मारहाण करुन त्यांच्याकडील ३२ हजाराचा ऐवज लुटण्यात आला. ही घटना तालुक्यातील उजनी जंगल परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी बोदवड येथील तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रावेर तालुक्यातील चोरवड येथील नवविवाहित तरुण राहुल विलास घेटे हा पत्नी सरला हिच्यासह शुक्रवारी दुचाकीने उजनी दर्ग्याच्या दर्शनासाठी गेला होता. तिथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास घराकडे परतत असताना त्याला नातेवाईकाचा मोबाईल आला. रस्त्याच्या कडेला तो दुचाकी लावून मोबाईलवर बोलत होता. त्याचवेळी जंगलातील झाडा- झुडपात दबा धरुन बसलेले चार जण अचानक त्यांच्यासमोर आले आणि एकाने सरला हिच्यावर पिस्तूल रोखले. इतर तीन जणांनी दोघांना झाडाला बांधून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडील दागिने काढून घेतले . यात सरला हिचे दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र, तीन हजाराचा मोबाइल, तर राहुलकडील १३ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावला. तसेच खिशातून पाच हजार चारशे रुपये रोख असे एकूण ३२ हजार रुपये काढून घेतले. पैसे मिळाल्यावर या चारही जणांनी या दाम्पत्याला सोडून दिले.
राहुल हा शुक्रवारी सायंकाळी घरी पोहचला. त्याने घडलेली घटना सांगितली. यानंतर शनिवार १९ रोजी रात्री १२ वाजता या लूटप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बोदवड पोलिसांनी रात्री चारपैकी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.