आरोग्य सेवेचा अभाव असलेल्या अफ्रिकेत रुग्णांना नवदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:07 IST2018-04-29T23:07:44+5:302018-04-29T23:07:44+5:30
रोटरीचा पुढाकार : उपचाराने दृष्टी गेलेले पुन्हा पाहू शकले सृष्टी

आरोग्य सेवेचा अभाव असलेल्या अफ्रिकेत रुग्णांना नवदृष्टी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ : आरोग्य सेवेअभावी वर्षानुवर्षे मोतीबिंदूचा त्रास सहन करीत दृष्टी गमावण्याची वेळ आलेल्या अफ्रिकेतील कॅमेरून देशात रोटरीच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या शिबिरात एकूण ८०० शस्त्रक्रिया होऊन ४०० डोळ््यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तेथील रुग्णांना नवदृष्टी मिळाली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात समावेश असलेल्या डॉक्टरांमध्ये रोटरी क्लब आॅफ जळगाव ईस्टचे सदस्य डॉ.पंकज शहा या एकमेव नेत्रविकार तज्ज्ञांचा समावेश होता व त्यांनी ४०० शस्त्रक्रिया केल्या हे विशेष.
रोटरी क्लब पानिपत आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्यावतीने अफ्रिकेतील कॅमेरुन येथे रुग्णांवर उपचारासाठी १० दिवसीय मेडिकल मिशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण २८ डॉक्टरांची निवड करण्यात आली व यामध्ये महाराष्ट्राचतील तीन डॉक्टरांचा समावेश होता. या तीनमध्येही एकमेव नेत्रतज्ज्ञ म्हणून जळगावातील डॉ. पंकज शहा यांचा समावेश होता.
अफ्रिकेमध्ये आरोग्यसेवेचा अभाव असल्याने तेथे वेगवेगळ््या आजाराचे रुग्ण त्रस्त आहेत. अनेकजण तर अंथरुणाला खिळून असतात. त्यांना उपचार मिळणे कठीण असल्याने तेथे भारतातून गेलेल्या या पथकाने १० दिवस वेगवेगळे उपचार केले व आजारापासून दिलासा दिला.
डोळ््यांच्या विकाराची तेथे मोठी समस्या आहे. विविध आजारासह मोतीबिंदूने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असून शेकडो रुग्णांचे मोतीबिंदू पिकून अनेकांना दिसत नाही. विशेष म्हणजे यामध्ये मोठ्यासह दोन ते पाच वर्षे वयाच्या बालकांनाही मोतीबिंदू असल्याची गंभीर स्थिती अफ्रिकेत आहे. लहान वयातच दृष्टी गेल्याने त्यांच्यावर संकट ओढावले. यावर मात करण्यासाठी या पथकातील डॉ. पंकज शहा यांनी पुढाकार घेत १० दिवसात ४०० डोळ््यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या व लहानग्यांसह सर्वांना नवदृष्टी दिली.