शिवाजीनगरवासीयासांठी प्लॅटफार्म क्रमांक पाचवर होणार नवीन आरक्षण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:38+5:302021-09-04T04:20:38+5:30
जळगाव : शिवाजीनगर भागाचा वाढता विस्तार लक्षात घेता, जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर नवीन आरक्षण कक्ष सुरू ...

शिवाजीनगरवासीयासांठी प्लॅटफार्म क्रमांक पाचवर होणार नवीन आरक्षण कक्ष
जळगाव : शिवाजीनगर भागाचा वाढता विस्तार लक्षात घेता, जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर नवीन आरक्षण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शिवाजीनगरकडून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. मात्र, कोरोनामुळे जनरल तिकिटाला बंदी असल्यामुळे, शिवाजीनगरच्या बाजूने असलेली जुनी तिकीट खिडकी दीड वर्षांपासून बंदच आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशनवर फलाटांची उंची वाढविणे, सरकते जिने, लिफ्टची सुविधा, नवीन आसने, तसेच आता नवीन दादरा आणि त्यावर रॅम्पची सुविधाही करण्यात आली आहे. रॅम्पमुळे दिव्यांग आणि वयोवृद्ध प्रवाशांना प्लॅटफार्मवर जाणे सोयीचे झाले आहे. दिवसेंदिवस स्थानिक रेल्वे प्रशासनातर्फे स्टेशनवर विविध प्रकारच्या सुविधा करण्यात येत असताना, आता शिवाजीनगरच्या बाजूने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकासांठी प्लॅटफार्म क्रमांक पाचवर नवीन आरक्षण तिकीट खिडकी सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणी आरक्षण तिकीटासह जनरल तिकीट सुरू झाल्यावर तेदेखील मिळणार आहे. २४ तास हा कक्ष सुरू राहणार आहे. या सुविधेमुळे सध्याच्या तिकीट खिडकींवर होणारी गर्दी काहीशी कमी होणार आहे.
इन्फो
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम झाल्यावरच ही खिडकी सुरू होणार
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व संरक्षण भिंत बंद करण्यात येणार आहेत. फक्त नवीन दादऱ्याच्या ठिकाणी शिवाजीनगरकडे जाण्या-येण्यासाठी एक रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम झाल्यानंतरच करण्यात येणार असून, त्यानंतर नवीन आरक्षण खिडकी सुरू करण्यात येणार आहे.
इन्फो :
प्लॅटफार्म क्रमांक पाचवर लिफ्टची सुविधाही होणार
गेल्या वर्षांपासून रेल्वे प्रशासनातर्फे प्लॅटफार्म क्रमांक पाचवरून गाड्यांची वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. सुरतकडून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्या या प्लॅटफार्मवरून भुसावळकडे रवाना होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी याठिकाणी लिफ्ट उभारण्यात येणार आहे. दरम्यान, नवनियुक्त डीआरएम एस.एस. केडिया यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव स्टेशनची पाहणी करून, रखडलेली विकास कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.