व्हेंटीलेटर खरेदीसाठी आता नव्याने प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:27+5:302021-09-05T04:20:27+5:30
जळगाव : कोरोना उपाययोजनांतर्गत मोहाडी रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदी रद्द झाल्यानंतर आता दुसऱ्या व्हेंटीलेटर खरेदीसाठी पर्यायी प्रक्रिया सुरू करण्यात आली ...

व्हेंटीलेटर खरेदीसाठी आता नव्याने प्रक्रिया सुरू
जळगाव : कोरोना उपाययोजनांतर्गत मोहाडी रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदी रद्द झाल्यानंतर आता दुसऱ्या व्हेंटीलेटर खरेदीसाठी पर्यायी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने वेगवेगळ्या उपकरणांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मोहाडी रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतरही शासकीय रुग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता तिसऱ्या लाटेत पुरेसे उपकरणे असावे, यासाठी उपाययोजना करीत असताना मोहाडी रुग्णालयासाठी व्हेंटीलेटर खरेदीचा निर्णय झाला व ही खरेदी चौकशीच्या फेऱ्यात अडकली. जेईएम पोर्टलवर ही खरेदी प्रक्रिया राबवित असताना शासनाच्या निर्देशांचा पालन करण्यात आल्याचा आरोग्य विभागाने दावा केला. मात्र तरीदेखील खरेदी केलेल्या व्हेंटिलेटर प्रकरणी तक्रार होऊन या खरेदीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवीन किस्से समोर येत गेले. खरेदी प्रक्रियेदरम्यान ज्या कंपनीचे व्हेंटीलेटर मागविले, त्या ऐवजी दुसऱ्याच कंपनीचे व्हेंटीलेटर पाठविले गेले. इतकेच नव्हे आरोग्य विभागाने ते स्वीकारलेदेखील. त्यामुळे या प्रकरणी चांगलेच वादळ उठले होते. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. या खरेदीवर आक्षेप घेतला गेल्याने पुरवठादाराची बिलाची रक्कम थांबविल्याचेही सांगण्यात आले. तसेच ही खरेदी रद्द करण्यात आली. मात्र या व्हेंटीलेटरचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. इतकेच नव्हे तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने व्हेंटीलेटर खरेदीविषयी काय नियोजन असणार, असेही प्रश्न निर्माण झाले.
या विषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना या विषयी विचारले असता त्यांनी आता पर्यायी खरेदी प्रक्रिया राबविली जाणार असून ती सुरू देखील झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता दुसरे व्हेेंटीलेटर खरेदी होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.