राष्ट्रवादीतील गटबाजी संपविण्याचे नवीन निरीक्षकांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:33+5:302021-07-15T04:13:33+5:30
दिग्गजांची फळी असूनही राष्ट्रवादीत मरगळ संपेना : महानगर, जिल्हा राष्ट्रवादीचा वादही चव्हाट्यावर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्ह्यात काही ...

राष्ट्रवादीतील गटबाजी संपविण्याचे नवीन निरीक्षकांसमोर आव्हान
दिग्गजांची फळी असूनही राष्ट्रवादीत मरगळ संपेना : महानगर, जिल्हा राष्ट्रवादीचा वादही चव्हाट्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रासह विधानसभेच्या सर्वात जास्त जागा असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची सद्यस्थिती बिकट होत जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली शिवसेना आक्रमक पद्धतीने भाजपला टक्कर देत असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला मरगळ आली असून, जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. तर महानगरपालिकेतदेखील राष्ट्रवादीची एकही जागा नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासोबतच गटबाजी संपविण्याचे आव्हान नवीन निरीक्षक अविनाश आदिक यांना पार करावे लागणार आहे.
जिल्हा राष्ट्रवादीचे नवीन निरीक्षक म्हणून अविनाश आदिक यांची नियुक्ती पक्षातर्फे करण्यात आली असून, हे पद स्वीकारल्यानंतर आदिक पहिल्यांदाच गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात आदिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जावून पक्षाचा आढावा घेणार आहेत; मात्र पक्षात वाढत जाणाऱ्या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आदिक यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
खडसेंच्या प्रवेशानंतरही मरगळ संपेना
भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारून पक्षाचे संघटन वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र खडसेंच्या प्रवेशानंतर ही मरगळ वाढतच जात असून, खडसे समर्थंकांची संघटनेत वर्णी लावण्यावरूनच पक्षात गटबाजी उफाळून आली आहे. त्यात खडसे देखील ईडीच्या फेऱ्यामुळे पक्षाला पुरेसा वेळ देताना दिसून येत नाहीत, त्यामुळे खडसेंच्या प्रवेशानंतरही राष्ट्रवादीतील मरगळ संपताना दिसून येत नाही.
दिग्गजांची फळी केवळ बैठकांपुरतीच
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सद्यस्थितीत अरुण गुजराथी, एकनाथ खडसे, ईश्वर जैन, डॉ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासारख्या दिग्गजांची फळी आहे; मात्र या फळीतील नेते केवळ बैठकांपुरतेच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दिसून येत आहेत, तसेच जिल्हा राष्ट्रवादी व महानगरमध्येदेखील ‘तू-तू, मै-मै’ वाढली असून, यांचा वाद चव्हाट्यावर आल्याने पक्षाची अब्रु वेशीवर टांगली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे.
आठवडाभरात अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी?
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी मजहर पठाण यांची नियुक्ती केली होती; मात्र आठवडाभरातच प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांनी मजहर पठाण यांची नियुक्ती रद्द करून, त्यांच्या जागी चोपड्याचे नोमन काझी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. यावरूनदेखील राष्ट्रवादीत गटबाजी वाढली असून, नवीन निरीक्षक अविनाश आदिक ही गटबाजी कशी मोडीत काढतात, याकडे लक्ष लागले आहे.