लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी बदली झालेले नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील हे मंगळवारी जळगावात रुजू होणार आहे. याबाबत त्यांनी दुजोरा दिला आहे. २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले होते.
डॉ. मिलिंद फुलपाटील हे नागपूर येथे शरीररचना शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांची जळगावात शरीरचना शास्त्र विभागाच्या प्राध्यापकपदी बदली करून त्यांच्याकडे अधिष्ठाता म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे, तर सध्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची धुळे येथे औषधशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यांच्याकडे अधिष्ठाता म्हणून जळगावचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. असे त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, जळगावात शरीररचना शास्त्र विभागात पदच रिक्त नसल्याचे सांगण्यात आले होते. या पदावर आधीच डॉ. अरुण कासोटे कार्यरत आहेत. त्यामुळे एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र, आता मंगळवारी आपण रुजू होणार असल्याबाबत डॉ. फुलपाटील यांनी दुजोरा दिला आहे, याबाबत नंतर नवीन आदेशात काढण्यात आलेला नाही.
ही असतील आव्हाने
गेल्या दीड वर्षाच्या काळात काहीच महिने नॉनकोविड यंत्रणा सुरू होती. ती यंत्रणा आता पूर्वपदावर आलेली आहे. या दीड वर्षात आधीपेक्षा काही महत्त्वाचे बदल रुग्णालयात झालेले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत रुग्णालयात चांगली झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही उत्तम नियोजन झालेले आहे. काही त्रुटी असल्या तरी आधीपेक्षा उपचार पद्धतीत सुटसुटीतपणा आला आहे. दिव्यांग बोर्डात कुपन वाटप करून एक नवीन प्रणालीचा अवलंब जळगावात झाला आहे. या सर्व चांगल्या बाबी टिकवून ठेवण्याचे आव्हान डॉ. फुलपाटील यांच्यासमोर राहणार आहे.