शाळा, महाविद्यालयात समुपदेशाची गरज
By Admin | Updated: June 13, 2014 14:59 IST2014-06-13T14:59:01+5:302014-06-13T14:59:01+5:30
अभ्यासाच्या नवीन पद्धती अनेक मुले समजून घेत नाही. त्यामुळे मुलांवर ताण येत असल्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे.

शाळा, महाविद्यालयात समुपदेशाची गरज
जळगाव : अभ्यासाच्या नवीन पद्धती अनेक मुले समजून घेत नाही. त्यामुळे मुलांवर ताण येत असल्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयात समुपदेशक नियुक्त करणे, आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी येथे केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. मंचावर अध्यक्ष किरण राणे, सचिव तुषार चित्ते, राधिका मलवारी, सिद्धीका मेमन व गनी मेमन उपस्थित होते. डॉ. जोशी पुढे म्हणाले, की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
तरीही अनेक मुलांना अपयश नको असते. अपयशाला तोंड द्यायला मुलांनी शिकले पाहिजे. कमी गुण मुलांना मिळाले तर पालक त्यांच्यावर दबाव आणतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढत जाते. त्यातूनच मुलं आत्महत्येचा मार्ग निवडतात. सिद्धीका मेमन यांनीही त्यांचे विचार मांडले.
आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्ती काही तरी संकेत देतात. पालकांनी ते समजून घेतले पाहिजे. आत्महत्या जो करणार आहे; त्याचे संकेत तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही त्यांचे मन परिवर्तीत करू शकतात, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.