अमृत आहार योजनेत वाटले अर्धवट बॉईल अंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:47+5:302021-09-04T04:21:47+5:30
चुंचाळे/यावल. तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या आदिवासी वस्तीवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत वाटप केलेले ...

अमृत आहार योजनेत वाटले अर्धवट बॉईल अंडे
चुंचाळे/यावल. तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या आदिवासी वस्तीवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत वाटप केलेले अंडे हे अर्धवट शिजवलेली असल्याची तक्रार नागरिकांनी केली व थेट अर्धवट कच्चे अंडे घेऊन त्यांनी यावल येथील महिला व बालविकास कार्यालय गाठत अर्धवट अंडी शिजवणाऱ्या सेविकेची लेखी तक्रार केली आहे.
येथील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत आदिवासी वस्तीवरील गरोदर मातांना शिजलेली अंडी अंगणवाडीच्या माध्यमातून वितरण केली जातात. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या जामुनझिरा या आदिवासी वस्तीवर असलेल्या अंगणवाडी सेविकेने चक्क अर्धवट शिजलेले अर्थात अर्धवट बॉइल अंडे वितरण केले. प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी संबंधित सेविकेवर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस पाटील हिरा पावरा, बिलारसिंग पावरा, भावसिंग पावरा, भाईराम पावरा, नरसिंग बारेला आदींनी ही मागणी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अंगणवाडी सेविकेस नोटीस बजावण्यात आली असून या संदर्भात दोन दिवसात सदरील सेविकेकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. ती दोषी आढळल्यास तिच्या विरूध्द कारवाई करण्यात येईल असे महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी सांगितले.
दरम्यान या सेविकेकडून ही जबाबदारी काढून घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविकेची तक्रार करताना आदिवासी नागरिक.