राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:48+5:302021-09-03T04:17:48+5:30
भाजपची राष्ट्रवादीवर टीका : केवळ चमकोगिरीसाठी आंदोलन केल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने ...

राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
भाजपची राष्ट्रवादीवर टीका : केवळ चमकोगिरीसाठी आंदोलन केल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. मात्र, राष्ट्रवादीचे हे आंदोलन म्हणजे आग कुठे लागली आणि पाणी कुठे मारताय अशीच परिस्थिती असल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आंदोलन केवळ चमकोगिरीसाठी असून, त्यांचे आंदोलन म्हणजे ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी‘ असल्याची टीका भाजपचे जळगाव शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे.
सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर महापालिकेसमोर आंदोलन करून, मनपा बरखास्त करण्याची मागणी केली होती. या आंदोलनावर आता भाजपने टीका केली आहे. भाजपकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महापालिकेत शिवसेनेने मिळविलेल्या सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला श्रेयदेखील मिळाले नाही आणि काही वाटादेखील मिळाला नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पोटात दुखले असून, जनतेची केवळ दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादीने चमकोगिरी करत हे आंदोलन केल्याचा आरोप या पत्रकाव्दारे करण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष सत्तेत असताना केवळ नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आल्याचा आरोपही या निवेदनातून करण्यात आला आहे. राज्यात सत्ता आहे, शहराच्या समस्या सोडवायच्या असतील तर मनपासमोर नाही तर महाविकास आघाडीच्या मंत्रालयासमोर आंदोलन करा जेणेकरून शहरासाठी निधी मिळेल व शहराच्या समस्या मार्गी लागतील, असा सल्ला भाजपने या निवेदनातून दिला आहे.