राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे एकाच व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 18:56 IST2021-01-31T18:56:36+5:302021-01-31T18:56:42+5:30
कोथळी येथील श्रीराम मंदिर समर्पण निधी संकलन कार्यक्रम

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे एकाच व्यासपीठावर
म ुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नोव्हेंबर २०मध्ये भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच ते त्यांची स्नुषा व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या समवेत एकाच व्यासपीठावर आल्याने राष्ट्रवादी आणि भाजपसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निमित्त होते श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन करण्याच्या कार्यक्रमाचे. दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी खडसे यांचे मूळगाव कोथळी येथील श्रीराम मंदिरात अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करणेकामी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तथा भाजपच्या खासदार रक्षा खडसे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार खडसे या माजी मंत्री खडसे यांच्या सून असल्या तरी खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदाच दोन्ही नेते अर्थात सून व सासरे एकत्र आले. याप्रसंगी मात्र खडसे तथा खासदार रक्षा खडसे यांनी स्वतःचा व गावाचा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक जितेंद्र जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले, माजी सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच उमेश राणे, मुक्ताईनगर तालुका हिशोबप्रमुख कुणाल सोनार, तालुका कार्यवाह जितेंद्र जाधव, निधी संकलन सह प्रमुख दिनेश चव्हाण, रघुनाथ चौधरी, दामोदर पाटील, दामोदर राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, सालबर्डी येथे श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यक्रम खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी सरपंच तृप्ती राणे, माजी सरपंच तुषार राणे, मुक्ताईनगर तालुका हिशोबप्रमुख कुणाल सोनार, तालुका कार्यवाह जितेंद्र जाधव, निधी संकलन सह प्रमुख दिनेश चव्हाण, पुनम झोपे, श्रद्धा झांबरे, शंकर जंगले, ललित खडसे, प्रभाकर झोपे, रमेश खाचणे, पुंजाजी झोपे, अनंता बऱ्हाटे आदी उपस्थित होते.