नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला!

By Admin | Updated: August 1, 2014 15:12 IST2014-08-01T15:12:43+5:302014-08-01T15:12:43+5:30

नंदनगरीच्या बाप्पांची महती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. यंदा जवळपास अडीचशे मूर्ती आफ्रिकेला रवाना होत असून, तेथेही ‘बाप्पाचा जयघोष’ होणार आहे.

Nandurbar's 'Bappa' visits Africa! | नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला!

नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला!

अडीचशे मूर्ती जाणार : प्रथमच ‘ग्लोबल क्रेझ’

मनोज शेलार, नंदुरबार
नंदनगरीच्या बाप्पांची महती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. यंदा जवळपास अडीचशे मूर्ती आफ्रिकेला रवाना होत असून, तेथेही ‘बाप्पाचा जयघोष’ होणार आहे. त्यामुळे नंदुरबारच्या गणेशमूर्तीला ‘ग्लोबल क्रेझ’ मिळणार आहे.
नंदुरबारमधील गणेशमूर्ती उद्योग राज्यात प्रसिद्ध आहे. येथील मूर्तींना गुजरात आणि मध्य प्रदेशातही मागणी आहे. १ इंचापासून ते २२ ते २५ फुटांपर्यंतच्या मूर्ती येथे तयार होतात. यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील तब्बल अडीचशे मूर्ती या दक्षिण आफ्रिकेत जाणार आहेत. त्यातील १०० मूर्ती पोहोचल्यादेखील आहेत. उर्वरित दीडशे मूर्ती पोहोचविण्यासाठी मूर्तिकार पंकज सोनार यांची लगबग सुरू आहे.
मूळचे नंदुरबार येथील जयेश सोनार नोकरीनिमित्त दहा-बारा वर्षे आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होते. मराठी आणि गुजराती कुटुंबांपर्यंत ही माहिती पोहोचल्यावर त्यांनीही गणेशोत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला.
त्यानुसार एक, दोन नव्हेतर अडीचशे कुटुंबांनी मूर्तीची मागणी केली. जयेश सोनार यांनी नंदुरबारातील त्यांचे नातेवाईक तथा मूर्तिकार पंकज सोनार यांना ही बाब सांगितली. त्यांनी मूर्ती पुरविण्यास होकार दिला.

एकाच आकारातील मूर्ती
एकाच आकारातील एकसारख्या मूर्तीची मागणी करण्यात आली. सोनार यांनी दगडूशेठ हलवाई यांचा गणपती, लालबागचा राजा हे दोन पर्याय ठेवले. त्यात लालबागचा राजाला पसंती मिळाली. त्यानुसार त्या छबीच्या, सहा इंच उंचीच्या अडीचशे मूर्ती बनविण्यात आल्या. १०० मूर्ती सुरतमार्गे विमानाने पाठविण्यात आल्या.

तीन डॉलरला मूर्ती
आफ्रिकेतील मूर्तीची किंमत तीन डॉलर ठेवण्यात आली आहे. आफ्रिकेत उत्सव साजरे करण्यासाठी नियम व अटी असल्याने तेथे गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता. परंतु महाराष्ट्रीयन आणि गुजराती कुटुंबांनी एकत्र येऊन सर्व अडचणींवर मात करत उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.

Web Title: Nandurbar's 'Bappa' visits Africa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.