जळगावात तपासणीच्या नावाखाली तोतया पोलिसाने लांबविले वृध्दाचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 20:25 IST2018-01-14T20:21:15+5:302018-01-14T20:25:57+5:30
पोलीस असल्याचे सांगून तपासणीच्या नावाखाली दोन भामट्यांनी प्रभातचंद हुकुमचंद जैन (वय ७८, रा. संगीता अपार्टमेंट, नेहरु चौक, जळगाव) यांच्याजवळील ५१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता मनपा समोर घडली. दरम्यान, हा तोतया पोलीस जैन हे मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली.याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावात तपासणीच्या नावाखाली तोतया पोलिसाने लांबविले वृध्दाचे दागिने
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १४ : पोलीस असल्याचे सांगून तपासणीच्या नावाखाली दोन भामट्यांनी प्रभातचंद हुकुमचंद जैन (वय ७८, रा. संगीता अपार्टमेंट, नेहरु चौक, जळगाव) यांच्याजवळील ५१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता मनपा समोर घडली. दरम्यान, हा तोतया पोलीस जैन हे मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली.याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रभातचंद जैन हे रविवारी सकाळी ८ वाजता निलेश जैन यांच्या घरातील मंदिरात पुजा करण्यासाठी राहत्या घरातून पायी निघाले होते. महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. ‘मी पोलीस आहे, माझे ओळखपत्र बघून घ्या, रात्री आम्ही तीन ते चार किलो गांजा पकडला आहे. त्यामुळे तपासणी सुरू आहे. मला तुमची तपासणी करायची आहे’ असे म्हणत जैन यांना हातातील घड्याळ, सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी असा ऐवज काढून रुमालात ठेवायला सांगितले. पॅँटच्या खिशातील पैसे काढण्याच्या तयारीत असताच चोरट्यांनी दुसरा रुमाल त्यांच्या हातात देऊन तेथून धूम ठोकली. ते गेल्यानंतर जैन यांनी रुमाल तपासला असता त्यात काहीच नसल्याचे लक्षात येताच जैन यांनी डोक्याला हात मारुन घेतला.
चोरटे फुटेजमध्ये कैद
वृध्दाला गंडविल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणच्या फुटेजमध्ये दोघं चोरटे कैद झाले आहेत. जैन यांनीही त्यांना ओळखले. या फुटेजच्या आधारावर पोलिसांनी चोरट्यांची माहिती मिळवली असून हा गुन्हा उघडकीस येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.