अमळनेरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:30 IST2020-04-13T18:29:28+5:302020-04-13T18:30:46+5:30
चांदणी कुर्हे येथील रवींद्र अजबसिंग पाटील याला १३ रोजी दुपारी १२ वाजता बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

अमळनेरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा खून
अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील चांदणी कुर्हे येथील रवींद्र अजबसिंग पाटील याला १३ रोजी दुपारी १२ वाजता बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ११ एप्रिल रोजी राकेश वसंत चव्हाण या गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर लगेच ही घटना झाल्याने खळबळ उडाली आहे.
मयत रवींद्र अजबसिंग पाटील (वय ४८) याने सुमारे सन २००० साली गावातीलच एक डॉक्टर महिला व तिच्या आईचा खून केला होता. त्यानंतर त्याने नाशिक व पैठण कारागृहातून शिक्षा भोगली होती. २ वर्षापूर्वी तो शिक्षा भोगून सुटला होता. त्याचे कुटुंब सुरत येथे राहते. १५ दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. १३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावात त्याचे काही लोकांशी भांडण झाले होते. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. पोलीस पाटील ज्ञानेश्वर प्रताप पाटील यांनी त्याला उपचारासाठी रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याच्यावर डॉ.प्रकाश ताळे यांनी उपचार केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा सुमारे ५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.